पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम रेतन शिबिरांचे आयोजन

वर्षभरात जिल्ह्यातील ७१ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम रेतन शिबिरांचे आयोजन केले आहे. कृत्रिम रेतन फेज-२ कार्यक्रमांतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पशुपालकांपर्यंत पोचणार आहेत.
Organizing artificial insemination camps in veterinary dispensaries
Organizing artificial insemination camps in veterinary dispensaries

रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील २७ हजारांहून अधिक गायींचे कृत्रिम रेतन करण्याचे नियोजन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. याची सुरुवात देवरुख येथून झाली. वर्षभरात जिल्ह्यातील ७१ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम रेतन शिबिरांचे आयोजन केले आहे. कृत्रिम रेतन फेज-२ कार्यक्रमांतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पशुपालकांपर्यंत पोचणार आहेत.

पशुपालकांच्या गोठ्यामध्ये जातिवंत दुधाळ जनावरे  तयार व्हावीत. तसेच पैशाची बचत व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना कृत्रिम रेतन करण्यात येते. २०१९-२० या आर्थिक वर्षात पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागात कृत्रिम रेतन कार्यक्रमाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली. त्यामुळे कोकणातील पाच जिल्ह्यांत कृत्रिम रेतनात रत्नागिरीने पहिला क्रमांक मिळविला.

गतवर्षी २५ हजार गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन करण्यात आले होते. त्याचा अनेक पशुपालकांना फायदा झाला आहे. गतवेळी शेवटच्या टप्प्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही लॉकडाउनच्या कालावधीतही ही मोहीम कायम ठेवली होती.

जिल्ह्यात ७१ पशुसंवर्धन दवाखाने आहेत. प्रत्येक दवाखान्याच्या परिसरात जाऊन तिथे कृत्रिम रेतन शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. २०११ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात सुमारे तीन लाखांपर्यंत पशुधन आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यात मोठी घट झाली आहे. हिरव्या चाऱ्याची अनुपलब्धता आणि वातावरणामुळे अनेक गायी, म्हशींची दूध देण्याची क्षमता कमी होते.

गावठी गाई, म्हशींमध्ये दूध देण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. अशा जनावरांपासून जातिवंत दुधाळ वंशावळ निर्माण झाली तर पशुपालकांना त्याचा फायदा होऊ शकतो. हे लक्षात घेऊन शासनाच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यात कोतवडे येथे हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com