गोंदीया जिल्ह्यात तीनशे हेक्‍टरवरील धान निघाले फोल

धान वाण
धान वाण

गोंदिया ः निर्धारित कालावधीपूर्वीच परिपक्‍व झालेले धान भरले नसल्याने ३०० हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. खासगी कंपनीने याची दखल घेत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.  सडक अर्जुनी तालुक्‍यातील डव्वा, चिरचाळी, डोंगरगाव व कोंदामेळी या चार गावांतील शेतकऱ्यांनी खासगी कंपनीच्या धान वाणाची लागवड केली होती. ११ जून २०१९ रोजी खरेदी करण्यात आलेल्या या धान वाणाची २६ जूनच्या दरम्यान लागवड करण्यात आली. सदर धान वाणाचा परिपक्‍वता कालावधी १४० दिवसांचा आहे. परंतु निर्धारित कालावधी होण्यापूर्वीच अवघ्या ७० दिवसांतच हे वाण परिपक्‍व झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अल्पावधीतच परिपक्‍व झालेल्या या धानाला असलेल्या लोंब्यांमध्ये दाणे नाहीत. त्या नुसत्या पोकळ असल्याने काही किलोचीदेखील उत्पादकता शेतकऱ्यांना होणार नाही. धान वाण फोल (पोचट) निघाल्याची ही बाब उघडकीस आल्याने डव्वा येथील शेतकरी आनंदराव कवळू जोशी, गोवर्धन दीनानाथ परशुरामकर, रेवाराम दीनानाथ परशुरामकर यांनी धानाचे फोल असलेल्या लोंब्या घेऊन जिल्हा परिषदेचे कृषी कार्यालय गाठले.  जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात नंतर शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी अनुप शुक्‍ला यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली. चार गावातील ३०० हेक्‍टरवरील धान अशाप्रकारे फोल निघाल्याचे शेतकऱ्यांनी या वेळी सांगीतले. त्याची दखल घेत कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. स्थानिक कृषी सेवा केंद्रातून या धान वाणाची खरेदी करण्यात आली होती. 

 शेतकरी जाणार न्यायालयात ज्या चार गावांमध्ये धान वेळेआधीच परिपक्‍व होत त्यातील लोंब्या भरल्या नाहीत, अशा गावांतील पिकाची पाहणी कृषी विभाग करणार आहे. त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे ग्राहक न्यायालयात जाण्याची तयारीदेखील शेतकऱ्यांनी चालविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com