अमरावती विभागात ३२ हजार हेक्‍टरवरील पिके उद्‌ध्वस्त 

बुधवारपासून अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे अमरावती विभागातील ३२ तालुक्‍यांतील ३२ हजार १७९ हेक्‍टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला.
 wheat damage
wheat damage

अमरावती ः बुधवारपासून अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे अमरावती विभागातील ३२ तालुक्‍यांतील ३२ हजार १७९ हेक्‍टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्यास बसला असून, यवतमाळ जिल्ह्यात सर्वांत कमी नुकसान झाले आहे. 

१७ ते २० मार्च या तीन दिवसांत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलडाणा या सर्व पाचही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसला. याचा फटका कापणीवर आलेल्या गव्हासह गंजी लावलेला हरभरा, मोहोरावरील आंबा, कांदा, लिंबू व संत्रा पिकांना बसला. शासनाने तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करून प्राथमिक अहवाल तयार करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. 

पाचही जिल्ह्यांचा अहवाल आला असून त्यामध्ये विभागात ३२ हजार १७९ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे म्हटले आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकाची कापणी व मळणी जवळपास झाली असली तरी उशिराने पेरणी झालेल्या गव्हाला व काढणीवर आलेल्या कांद्याला अधिक फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील २२३ गावे बाधित झाली असून, २ हजार ६२७ हेक्‍टर क्षेत्रातील गहू, १३६ हेक्‍टर क्षेत्रातील चणा, ४३४ हेक्‍टर क्षेत्रातील कांदा, ६२ हेक्‍टरमधील केळी, २२ हेक्‍टरमधील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. 

संत्रा उत्पादकांचा जिल्हा असलेल्या या जिल्ह्यातील अमरावती, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, मोर्शी, अचलपूर व चांदूरबजार या तालुक्‍यांतील एकूण ११ हजार ६८८ हेक्‍टर क्षेत्रातील संत्राफळांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाचा सात गावांना फटका बसला असून २४ कुटुंबे बाधित झाले आहे. वीज पडून एका व्यक्तीचा, तर चार जनावरांचा मृत्यू झाला. १९ घरांची अंशतः तर एका घराची पूर्णतः पडझड झाली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील नेर, बाभूळगाव व महागाव तालुक्‍यांत पावसाने नुकसान झाले आहे. नेर तालुक्‍यातील गहू, ज्वारी, टरबूज, हरभरा, पपई, भाजीपाला, संत्रा, लिंबू, आंबा, तर बाभूळगाव तालुक्‍यात पिंपळखुटा येथील शेवंताबाई मेश्राम या महिलेचा भिंत पडून मृत्यू झाला. सोबतच पिकांचे नुकसान झाले. महागाव तालुक्‍यातही शेतीपिकांना फटका बसला आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, मेहकर व सिंदखेडराजा या तालुक्‍यांतील २२२ गावे बाधित झाली असून, १० हजार ४१३ शेतकऱ्यांचे ७ हजार ३८० हेक्‍टर क्षेत्रातील कांदा, मका, गहू, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, पातूर या तालुक्‍यांतील ४ हजार ७७० हेक्‍टर क्षेत्रातील गहू, कांदा, पपई, लिंबू, आंबा या पिकांना फटका बसला.  जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्‍टर) 

जिल्हा तालुके क्षेत्र 
अमरावती १० १४,९९४ 
अकोला ४७७० 
यवतमाळ ः १५३ 
बुलडाणा ७३८० 
वाशीम ४८८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com