अकोल्यात अवकाळीने ४७७० हेक्टरचे नुकसान 

जिल्ह्यात १८ व १९ मार्चला आलेला अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचे सुमारे ४७७० हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने वरिष्ठांकडे सादर केला आहे.
Akola papaya
Akola papaya

अकोला ः जिल्ह्यात १८ व १९ मार्चला आलेला अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचे सुमारे ४७७० हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने वरिष्ठांकडे सादर केला आहे. यात सर्वाधिक ४०५० हेक्टरवर अकोट तालुक्यात नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले आहे.  जिल्ह्यात १८ मार्चपासून पावसाळी वातावरण बनलेले आहे. दोन दिवस तुफानी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. प्रामुख्याने अकोट तालुक्यात या पावसाने नुकसान झाले. अकोट तालुक्यात गहू, कांदा बीजोत्पादनाचे ४०५० हेक्टरवर नुकसान झाले आहे. याशिवाय मूर्तीजापूरमध्ये ११३ हेक्टरवर कांदा, गहू, पपई, लिंबू, आंबा, भाजीपाला, पातूरमध्ये ५९५ हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, लिंबू तसेच इतर पिकांना तडाखा बसला. बार्शीटाकळी तालुक्यात ११.८२ हेक्टरवर नुकसान झाल्याचा अहवाल बनविण्यात आला आहे.  जिल्हयात या अवकाळी पावसाने तसेच गारपिटीमुळे विविध भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी संकटात आला आहे. जिल्ह्यातील पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत.  जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाळी वातावरण बनलेले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे. या तडाख्यात कांदा, उन्हाळी तीळ, भाजीपाला, लिंबू, गहू, हरभरा आदी पिके सापडलेली आहेत. कृषी विभागाने तातडीने पुढाकार घेत स्थानिक यंत्रणांमार्फत नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करीत वरिष्ठांना पाठविला आहे. 

पावसाने मांडले ठाण  जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सातत्याने कुठेना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी (ता.२१) दुपारनंतर काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी (ता.२२) पहाटेपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. ढगांच्या गडगडासह पावसाने अकोला व परिसरात हजेरी दिली. याकाळात विजांचा कडकडाटही जोरात होता. सततच्या पावसामुळे गहू, हरभरा सोंगणीचे काम लांबणीवर पडले आहे. सोंगणी केलेले पीक शेतात ओले झाले आहे. तर अशा वातावरणामुळे टरबूज, खरबूज मागणी कमी झाल्याचा परिणाम या फळांच्या दरांवर झाला. व्यापारी अवघे पाचशे ते सातशे रुपयांदरम्यान या फळांची प्रतिक्विंटल मागणी करीत आहेत. इतर भाजीपाल्याचेही दर पडले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com