कर्नाटकात ७० टक्क्यांवर शांततेत मतदान

कर्नाटकात ७० टक्क्यांवर शांततेत मतदान
कर्नाटकात ७० टक्क्यांवर शांततेत मतदान

बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी (ता. १२) सायंकाळी ५.३० पर्यंत ७० टक्के मतदान शांततेत पार पडले. २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी २२२ जागांवर एकूण २६२२ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. २००८ च्या विधानसभेसाठी ६४.६८ टक्के, २०१३ साठी ७१.४५ टक्के, २०१४च्या लोकसभेसाठी ६७.२८ टक्के नागरिकांनी मतदान केले होते. २०१४ मध्ये कॉंग्रेस पक्ष स्पष्ट बहुमतात आला हाता. यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने २२० जागा, तर भाजपने २२२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी जनता दलाचे (सेक्युलर) १९९, तर बहुजन समाज पक्षाने १८ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते.  मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपली दहावी आणि शेवटची निवडणूक म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्‍वरी मतदारसंघातून लढवत आहेत. सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि जनता दल (एस) या पक्षांकडून जिंकण्याचा दावा केला जात आहे. सिद्धरामय्या यांनी सांगितले, की कर्नाटकातील जनतेसाठी पाच वर्षे विकासकामे केली. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, या निवडणुकीत काँग्रेस १२० पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त करून सत्ता स्थापन करेल. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांनी शिकरीपुरा येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल आणि पुढील सरकार आमचे असेल, असे सांगितले.    माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे नेते देवेगौडा यांनी सांगितले, की आम्ही या निवडणुकीत ''किंगमेकर''ची भूमिका बजावून सत्ता स्थापन करू. जनता दलचे (एस) नेते कुमारस्वामी आणि त्यांच्या पत्नीने रामानागरा मतदानाचा हक्क बजावला. या वेळी कुमारस्वामी म्हणाले, आम्हाला विश्वास आहे, या निवडणुकीत जेडीएस बहुमताचा आकडा पार करून सत्ता स्थापन करेल.  कर्नाटकचे माजी लोकायुक्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी बंगळुरू येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून गैरप्रकार वाढले आहेत. साड्यांचे वाटप, दारू, धोती आणि कुकरचे वाटप केले जाते आणि मतदारांना प्रभावित केले जाते. हे लोकशाहीचे योग्य उदारहण नाही. बंगळुरुचे पोलिस उपायुक्त रवी चन्नन्नवर यांनी सांगितले, की हा एक संवेदनशील मतदान केंद्र आहे. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर वादाचे प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. याबाबत आम्ही तपास सुरू केला असून, संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.    बेळगाव जिल्ह्यातील १८ जागांसाठी २०३ उमेदवार रिंगणात असून, सीमाभागातील बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्‍यातील निवडणूक मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पार पडलेले मतदान अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्‍वासार्हतेवर विरोधी पक्ष प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत असताना राज्यामध्ये प्रथमच निवडक ठिकाणांवर तिसऱ्या पिढीतील मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. केवळ महिला अधिकाऱ्यांचे नियंत्रण असलेले "पिंक बूथ''देखील चर्चेचा विषय ठरले होते. मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ व्हावी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी या उपक्रमांचे आयोजन केले होते. तिसऱ्या पिढीतील अत्याधुनिक "एम-3 ईव्हीएम' यंत्रांमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये हस्तक्षेप करणे शक्‍य नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला असून तसा प्रयत्न कोणी केल्यास संबंधित यंत्र हे आपोआप बंद पडते. पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर बंगळूरमधील राजाराजेश्‍वरी नगर, शिवाजीनगर, शांतीननगर, गांधीनगर आणि राजाजीनगरमध्ये हा उपक्रम राबविला जाणार होता. राजाराजेश्‍वरीनगरमध्ये दहा हजारांपेक्षाही अधिक बोगस मतदार ओळखपत्रे सापडल्याने येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. या नव्या "ईव्हीएम'मध्ये काही अद्ययावत फीचर्सचा समावेश असून यातून बॅटरीची स्थिती, या यंत्राचे डिजिटल सर्टीफिकेशन पाहता येते. तसेच या यंत्राशी कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, तर संबंधित यंत्र हे स्वत:हून याची माहिती मुख्य यंत्रणेला देते. अद्ययावत फीचर्सचा समावेश बंगळूरमधील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये साडेचारशे पिंक बूथ उभारण्यात आले असून त्याचे सखी असे नामकरण करण्यात आले आहे. यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. म्हैसूर, चामराजनगर आणि उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या मोठी असल्याने त्यांच्या जीवनशैलीशी साधर्म्य साधणारी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

‘‘कॉंग्रेस प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, सरकार स्थापनेचा दावा करणारे भाजप नेते येड्डियुराप्पा यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे.’’ - सिद्धरामय्या, मुख्यमंत्री कर्नाटक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com