पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे ३१७६ हेक्टरवरील पिके, फळपिके तसेच शेतजमिनीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ९१३४ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, ५० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना जिल्ह्यातील शेतजमिनी आणि पिकांच्या नुकसानीबाबतच्या प्राथमिक अहवालाची माहिती नुकतीच सादर केली. त्यामधून ही बाब स्पष्ट झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित हा अहवाल तयार केला आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे एकूण दोन लाख ९३ हजार २९१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी बारामती, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यातील सुमारे १५४ गावांमधील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.  पुरंदर तालुक्यातील वज्रगड, किल्ले पुरंदर आणि परिसरात २५ सप्टेंबरला रात्री ढगफुटी झाली. त्यामुळे परिसरातील सासवड, नारायणपूर, नारायणपेठ, भिवडी, चिव्हेवाडी, सुपे खुर्द अशा सुमारे वीसहून अधिक गावांमधील शेतजमिनी, उभी पिके, घरे, जनावरांचे गोठे, जनावरे, वाहने, छोटे पूल यांचे नुकसान झाले. अनेक विहिरी गाळाने भरल्या तर अनेक विहिरी खचल्या. रस्त्याचेही मोठे नुकसान झाले. ढगफुटीमुळे पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात.

बारामतीमध्येही पुराच्या पाण्यामुळे मोरगाव, तरडोली, जळगाव सुपे, जळगाव कॅंप, बाभुर्डी, कऱ्हाटी, अंजनगाव, बऱ्हाणपूर, मेडद, नेपतवळण, कऱ्हा वागज, बारामती ग्रामीण, मळद, गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी, लोणी भापकर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  स्थानिक कृषी विभाग, महसूल विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. यामध्ये पिकांचे नुकसान क्षेत्र, घरे, जनावरे, वाहने, पुरामुळे वाहून गेल्या व्यक्ती यांचा समावेश होता. ही माहिती घेऊन ती तत्काळ जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आली. सध्या नुकसान झालेल्या गावांमध्ये पंचनामे सुरू असून लवकरच नुकसानीबाबतची नेमकी माहिती पंचनाम्यातून स्पष्ट होईल.  

प्राथमिक अहवालानुसार तालुकानिहाय बाधित क्षेत्र आणि शेतकरी संख्या
तालुका क्षेत्र  शेतकरी संख्या
हवेली  ३२९ १३०८
भोर १५७ ६०२
वेल्हा १५  २२१
पुरंदर २३०१ ५६६२
बारामती ३७४ १३४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com