‘हिक्का’मुळे रत्नागिरीत रात्रभर पाऊस

‘हिक्का’मुळे रत्नागिरीत रात्रभर पाऊस
‘हिक्का’मुळे रत्नागिरीत रात्रभर पाऊस

रत्नागिरी : हिक्का वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. मंगळवारी (ता. २४) रात्री जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. कापणीयोग्य भात पडायला लागला आहे. दमट वातावरणामुळे निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. 

बुधवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ८४.८९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ८३, दापोली ४०, खेड १०२, गुहागर ३०, चिपळूण ६५, संगमेश्‍वर ११८, रत्नागिरी १४१, लांजा ११०, राजापूर ७५ यांचा समावेश आहे. जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी पाऊस ४७४० मिमी पाऊस झाला. गेले चार ते पाच दिवस दिवसांतून एखादी सर पडत होती; मात्र मंगळवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. हळवी भात बियाणे कापणीसाठी सज्ज झाली आहेत. कडकडीत ऊन पडले की कापणीला सुरुवात होईल; मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे कापणीत अडथळा निर्माण झाला आहे.

दरम्यान, पावसाची उघडीप आणि प्रखर सूर्यप्रकाश हे वातावरण भातावरील निळे भुंगेरे किडीला पोषक आहे. ज्या भागात ओहोळ, ओढे अथवा नाल्याजवळ भात शेती आहे, तिथे त्यांचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळतो. हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. भातपिकावर गेल्या तीन-चार वर्षांपासून निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीमुळे भात उत्पादनावर परिणाम होतो. यावर शेतकऱ्यांनी कसून लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास तत्काळ उपाययोजना कराव्या, असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले.

ही घ्या काळजी... निळ्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच त्वरित क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २.५ मि.लि. किंवा टायझोफॉस ४० टक्के प्रवाही १.२५ मि.लि. किंवा लॅमडा सायहेलोथ्रिन ५ टक्के प्रवाही ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाण्यामधून फवारणी करावी. या द्रावणामध्ये स्टिकरचा वापर करावा; जेणेकरून फवारणी झाल्यानंतर कीटकनाशक पावसाने धुऊन जाणार नाही. प्रादुर्भाव जास्त असल्यास १० ते १२ दिवसांनंतर कीटकनाशकाची दुसरी फवारणी करावी. प्रथम फवारणीस वापरलेले कीटकनाशक दुसऱ्या फवारणीस वापरू नये, असे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून कळविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com