कापसावरील टोळधाडीने पाकिस्तान धास्तावला

सौदी अरेबियाने नियंत्रण मोहीम हाती घेतल्यानंतरही टोळ इराणमार्गे पाकिस्तानात दाखल झाले. बलुचिस्तानमध्ये सध्या पाऊस असल्याने आणि ही परिस्थिती टोळांना प्रजननासाठी अनुकूल असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. सिंध प्रांतात कापूस शेतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. - मोहम्मद तारिख खान, अधिकारी,राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि संशोधन, पाकिस्तान
टोळधाड
टोळधाड

सिंध, पाकिस्तान:  पाकिस्थानातील कापूस पीक टोळधाडीच्या कचाट्यात सापडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आले आहेत. सिंध प्रांतातील तब्बल दोन लाख हेक्टरवरील पीक टोळधाडीने फस्त केले आहे. टोळ हे थव्याने येत असल्याने नुकसानीची पातळी जास्त असते. मोठे टोळ हे दिवसाला १५० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतात. दिवसाला त्यांच्या वजनाएवढे अन्न टोळ खातात. टोळचा एक थवा हा दिवसाला ३५ हजार माणसांना पुरेल एवढे अन्न फस्त करत असल्याने तेथील अन्नसुरक्षा धोक्यात येते.   टोळधाडीच्या संकटाने शेतकरी, जिनिंग आणि सरकारची चिंता वाढली आहे. पाकिस्तान सरकारने परिस्थितीवर मात करण्यासाठी कीटकनाशक आरोहित वाहने आणि विमाने रवाना केली आहेत.  एकट्या सिंध प्रांतात दोन लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याने जिनिंग उद्योगही धास्तावला आहे. येथील शेतकऱ्यांना रात्रही आता टोळचे नियंत्रण करण्यासाठी जागतच काढावी लागत आहे. ‘‘२५ मे रोजी सिंध प्रांतातील सिंचन सुविधा असलेल्या शेतीपासून टोळ १८ किलोमीटर अंतरावर आढळले होते. सध्या टोळची संख्या वाढण्यासाठी पूरक वातावरण आहे. येणाऱ्या काळात टोळचे संकट अधीक वाढणार आहे. याची कल्पना प्रशासनाला देण्यात आली आहे,’’ असे स्थानिक शेतकरी आणि स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये १९९३ आणि १९९७ मध्ये मोठे टोळ हल्ले झाले होते.  सौदी अरेबिया, इराणलाही फटका यंदा टोळचा उदय जानेवारी महिन्यात सुदान आणि इरिट्रीया येथे झाला. त्यानंतर वाऱ्याच्या दिशेने प्रवास करत फेब्रुवारी महिन्यात सौदी अरेबिया आणि इराण देशात धुडगूस घालत मार्च महिन्यात पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये टोळने प्रवेश केला. सौदी अरेबियाने टोळचा प्रादुर्भाव होताच नियंत्रण मोहीम हाती घेतली. परंतु ज्ञात नसलेले आणि कळपाने राहणारे अनियंत्रित टोळ इराणकडे वळाले आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला.  फळबागांवरही आक्रमण बलुचिस्तानमध्ये टोळधाडीने आपला मोर्चा फळपिकांकडे वळविला. डाळिंब आणि कलिंगड पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच अन्नधान्य आणि कापूस पिकावरही टोळने आक्रमण केले. पाकिस्तान सरकारने जास्त नुकसान झाले नसल्याचे सांगितले असले तरीही शेतकऱ्यांनी नुकसानीची पातळी जास्त असल्याचे म्हटले आहे.    राजस्थानमध्येही आगमन राजस्थानमधील पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्येही टोळचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकरी आणि स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. सुरवातीला जैसलमेर जिल्ह्यातील मुनाबो गावात टोळ आढल्यानंतर त्यांचा प्रसार संपूर्ण जिल्ह्यात आणि नंतर शेजारच्या काही जिल्ह्यांमध्ये झाला आहे. राजस्थानमध्ये ११९३ नंतर तब्बल २६ वर्षांनी टोळने हल्ला चढविला आहे. टोळ हे सामान्यतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातील जून आणि जुलै महिन्यात आढळतात. राजस्थानमध्ये सरकारने प्रतिबंधित उपाय सुरू केले असून आतापर्यंत १७७६ हेक्टर क्षेत्र टोळमुक्त केले आहे.  काय आहे टोळधाड लोकस्ट असे इंग्रजी नाव असलेल्या कीटकांना ‘टोळधाड’ म्हणूनच जगभर ओळखले जातात. ‘ॲक्रिडीई’ या कुळातील व ऑर्थोप्टेरा गणात येणाऱ्या या कीटकांची जगभर मोठी विविधता आढळते. याच कीटकांचे लहान रूप म्हणून नाकतोड्याला ओळखले जाते. स्पोडोप्टेरा वर्गातील अळ्या ज्याप्रमाणे समूहाने पिकांवर हल्ला चढवतात, त्यानुसार त्यांना लष्करी अळी म्हणून संबोधले जाते. तशाच प्रकारे हे टोळदेखील आपल्या पंखांचा आधार घेत प्रचंड थव्याने कित्येक मैल दूर प्रवास करतात. शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान करतात. म्हणूनच त्यांना टोळधाड म्हटले जाते. सर्वसाधारणपणे हे टोळ एकट्यानेच राहात असतात. मात्र काही परिस्थितीत त्यांचे वर्तन बदलते, ते अधिक आक्रमक होतात. त्यांचे रूपांतर थव्यात होऊन जाते. जगभरातच या कीटकांनी शेती क्षेत्रात गंभीर समस्या तयार केली आहे. डेझर्ट लोकस्ट (वाळवंटी टोळ) हा जगातील सर्वांत प्रसिद्ध असणारा टोळ आहे. उत्तर आफ्रिकेपासून ते मध्य आशियासह भारतापर्यंत त्याचा प्रसार झाला आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोपीय खंडांपर्यंत या टोळांची व्याप्ती दिसून आली आहे. लोकस्टा मायग्रॅटोरीया, ऑस्ट्रेलियन प्लेग लोकस्टा असे त्याचे अनेक प्रकार आहेत. कित्येक अब्ज रुपयांचे नुकसान या टोळधाडीमुळे झाले आहे. हवाई फवारणी हाच त्यावरील प्रभावी उपाय मानला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com