पाकिस्तान भारताकडून करणार कापूस, साखर आयात

पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करण्यास मंजुरी दिली आहे, तसेच भारताकडून ३० जून २०२१ पर्यंत कापूस आणि साखरेची आयात करू, असेही पाकिस्तान कॅबिनेटच्या आर्थिक समन्वय समितीने म्हटले आहे.
पाकिस्तान भारताकडून करणार कापूस, साखर आयात
पाकिस्तान भारताकडून करणार कापूस, साखर आयात

जळगाव/ नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करण्यास मंजुरी दिली आहे, तसेच भारताकडून ३० जून २०२१ पर्यंत कापूस आणि साखरेची आयात करू, असेही पाकिस्तान कॅबिनेटच्या आर्थिक समन्वय समितीने म्हटले आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानसोबत पुलवामा घटनेनंतर सुमारे वर्षभरापासून बंद असलेला व्यापार सुरू होणार आहे. पाकिस्ताननेदेखील बालाकोटचे कारण सांगून भारतासोबतचा व्यापार थांबविल्याचे म्हटले होते. पण याचा अधिक फटका पाकिस्तानलाच बसला. ‘अॅग्रोवन’ने पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती, या शीर्षकाने ३ मार्च रोजी भारत व पाकिस्तानमधील कापसाचा व्यापार व पाकिस्तानची भारतासोबत व्यापार सुरू करण्याची तयारी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते, हे वृत्त अखेर खरे ठरले आहे.  पाकिस्तानमधी वस्त्रोद्योगातील मंडळी व विविध संघटनांनी भारताकडून कापसाची आयात सुरू करण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे पाठपुरावा केला होता. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे वित्तीय सल्लागार व इतर वरिष्ठांनी हा मुद्दा लावून धरला होता. यानंतर भारतासोबत व्यापाराची तयारी पाकिस्तानने सुरू केली आणि अखेरिस पाकिस्तान सरकारच्या कॅबिनेटमधील आर्थिक समन्वय समितीने या व्यापारास मंजुरी दिली. 

पाकिस्तान भारतीय कापसाचा मोठा खरेदीदार राहीला आहे. चीन, भारतानंतर पाकिस्तानचा वस्त्रोद्योग ओळखला जातो. पाकिस्तानात चीननेदेखील वस्त्रोगासंबंधी गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानला दरवर्षी १५० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवश्यकता असते. परंतु तेथील उत्पादन सतत घटले आहे. यंदा तर तेथे सुमारे २० ते २५ लाख गाठींचा तुटवडा आहे. 

पाकिस्तान दरवर्षी भारताकडून सहा ते सात लाख गाठींची आयात करायचा. तसेच सुमारे २०० ते २५० कोटी किलोग्रॅम सुताची आयातही करायचा. पाकिस्तानाच्या पंजाब व लगत कापसाची लागवड एप्रिलमध्येच केली जाते. तेथे लागवड २२ ते २३ लाख हेक्टवर असते. कृषी विद्यापीठे व इतर यंत्रणा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु तेथेही प्रतिकूल वातावरणाने कापसाच्या पिकाला फटका बसला आहे. 

जगात अमेरिका क्रमांक एकचा कापूस निर्यातदार आहे. यानंतर भारत, ब्राझील व आफ्रिकन देश कापूस निर्यातीत पुढे आहेत. परंतु सध्या अमेरिका, ब्राझीलचा कापूस पाकिस्तानला महाग पडत होता. भारतीय खंडीचे दर (३५६ किलो रुई) ४७ ते ४८ हजार रुपये आहेत. तर अमेरिकेसह ब्राझीलच्या खंडीचे दर ५३ ते ५३ हजार रुपये असे आहेत. तसेच अमेरिकेतून किंवा ब्राझीलमधून कापूस आणण्यासाठी पाकिस्तानला ५० ते ६० दिवस कालावधी लागतो. तर भारतीय कापूस किंवा रुई, सूत फक्त चार ते पाच दिवसांत पाकिस्तानात रस्तेमार्गे पोहोचू शकतो.

चीन, बांगलादेशशी पाकिस्तानचे संबंध व्यापारी दृष्टीने चांगले आहेत. परंतु हे दोन्ही देश पाकिस्तानला कापसाचा पुरवठा करू शकत नाहीत. कारण बांगलादेशात कापसाचे उत्पादन अपवाद वगळता होत नाही. तर चीन कापसाचा जगातील सर्वांत मोठा खरेदीदार किंवा आयातदार आहे. दुसरीकडे आमेरिकेने चीनच्या कापडाची खरेदी, आयात बंद केली. चीन बालमजुरांचा उपयोग करून आपल्या भागात कापडनिर्मिती करतो, असा दावा अमेरिकेने केला व चीनच्या कापडावर बंदी घातली. यामुळे कोरोना संकटात कापड व कापडाच्या विविध बाबींची मोठी मागणी, चांगली बाजारपेठ उपलब्ध असताना पाकिस्तान रुई, कापसाच्या तुटवड्याने या संधीचे सोने करू शकत नव्हता. पाकिस्तानचा वस्त्रोद्योग कापूस, सुताच्या तुटवड्याने ६० ते ६५ टक्के क्षमतेने कार्यरत होता. या स्थितीत पाकिस्तानला भारतीय कापसाशिवाय पर्याय नव्हता व त्यांनी भारतासोबत व्यापाराला परवानगी दिली, अशी माहिती जाणकारांनी दिली. पाकिस्तानसोबत कापसाचा व्यापार सुरू झाल्यास दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. कारण पाकिस्तान भारताकडून गतीने कापूस खरेदी करील, असे संकेत मिळत आहेत. 

काही दिवसांपासून सकारात्मक भारताविरोधात अनेकदा छुप्या व इतर कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या सरकारने व्यापार सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यात भारत व पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाणीवाटपासंबंधी दिल्लीत चर्चा सुरू झाली. याच वेळी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी जुने विसरा व नवी सुरुवात करा, असा संदेश दिला होता. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा देणारे पत्र पाठविले होते. २९ मार्च रोजी एक पत्र पाठवून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी धन्यवाद म्हणत त्याचे उत्तर दिले होते. या पत्रात खान यांनी भारताला कोवीड १९ पासून बचावासाठी ऊर्जा मिळावी व शांतता असावी, असे मुद्दे उपस्थित केले होते. 

प्रतिक्रिया.. भारतासोबत व्यापाराला परवानगी देण्याचा निर्णय पाकिस्तानच्या कॅबिनेटमधील आर्थिक समन्वय समितीने घेतला आहे. पाकिस्तान जूनपर्यंत कापसाची मोठी खरेदी भारताकडून करील. यामुळे भारतीय कापूस बाजारात तेजी पाच ते सहा टक्के वाढू शकते. पाकिस्तान भारताचा जुना कापूस खरेदीदार आहे. या निर्णयाचा लाभच भारतीय कापूस उत्पादकांना होईल.  - महेश सारडा, अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन (हरियाना)

पाच लाख टन साखर आयातीचा निर्णय नवी दिल्ली : पाकिस्तानातील साखरेच्या किमती आटोक्‍यात ठेवण्यासाठी आर्थिक समन्वय परिषदेची बैठक होऊन पाच लाख टन शुभ्र साखर आयात करण्याची निर्णय करण्यात आला. पाकिस्तानने भारतीय कापूसासह साखर आयातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात साखरेच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत.  या महागाईमुळे नागरिकांमध्ये असंतोषही वाढत चालला होता. साखरेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याने पाकिस्तानी खासगी आयातदारांनी भारतीय साखरेची आयात करण्याबाबतची मागणी सरकारकडे करण्यास सुरुवात केली होती. त्याची दखल घेऊन आणि पाकिस्तानातील साखरेच्या किमती आटोक्‍यात ठेवण्यासाठी आर्थिक समन्वय परिषदेची बैठक होऊन पाच लाख टन शुभ्र साखर आयात करण्याची निर्णय करण्यात आला. एप्रिल महिन्यात रमझान सुरू होत असल्याने साखरेच्या मागणीतही मोठी वाढ झाली होती. 

भारतात साखरेची अतिरिक्त साठा उपलब्ध आहे आणि गेल्या काही दिवसांपासून साखर कारखानदारांनीही केंद्र सरकारकडे साखर निर्यातीसाठी परवानगी देण्याबाबत मागणी सुरू केली होती. पाकिस्तानने हे निर्बंध उठविल्यामुळे भारतीय साखरेची निर्यात शक्‍य होऊन भारतातील साखरेचा अतिरिक्त साठा कमी होण्यास मदत होणार आहे. पाकिस्तानने मार्च महिन्यात पन्नास हजार टन साखरेसाठी निविदा मागवल्या होत्या; परंतु चढ्या व न परवडणाऱ्या दरांमुळे त्या फेटाळण्यात आल्या होत्या. थायलंडने पाकिस्तानला सवलतीच्या दरात साखर देऊ करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भारताने त्याहूनही रास्त दरात साखर उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते. थायलंडच्या तुलनेत भारतीय साखरेची वाहतूक अधिक सुलभ असल्याने पाकिस्तानलाही भारतीय साखरेची आयात रास्त दरात करणे शक्‍य होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com