पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती

पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात येण्याचे संकेत मिळत आहेत. उरी, पुलवामा येथील घटनेनंतर भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबविला आहे.
cotton
cotton

जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात येण्याचे संकेत मिळत आहेत. उरी, पुलवामा येथील घटनेनंतर भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबविला आहे. परंतु सीमेवर तणाव असला तरी आपल्या वस्त्रोद्योगाला कापसाचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी पाकिस्तान भारताकडून रुईसह सुताची आयात करणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.  पाकिस्तान कापूस उत्पादनात गेले तीन वर्षे मागे पडला आहे. तेथे किमान १२५ लाख गाठींची आवश्यकता असते. तेथेही वस्त्रोद्योग रोजगाराचे मोठे माध्यम आहे. बांगलादेशच्या तुलनेत पाकिस्तानचा वस्त्रोद्योग आघाडीवर आहे. तेथील पंजाब व इतर भागात जूनमध्येच कापसाचे उत्पादन घेण्यास सुरवात होते. तेथेही २३ ते २४ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. १२० ते १३० लाख गाठींच्या उत्पादनाचे उद्दिष्ट तेथील सरकार गेले तीन वर्षे हाती घेत आहे. त्यासाठी तेथील कृषी विद्यापीठे, सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु कापूस उत्पादनात तेथे सतत घट येत आहे. २०२०-२१ च्या हंगामात २० लाख गाठींचे उत्पादन कमी आले आहे. कोरोनाच्या संकटात जगभरात वस्त्रोद्योग व्यवस्थित कार्यरत आहे. कापडाला मोठी मागणी युरोप, अमेरिकेसह इतर भागात आहे. चीनच्या कापडावर अमेरिकेने बालमजुरांच्या वापराचे कारण सांगून मध्यंतरी बंदी घातली आहे. त्यामुळे भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, तुर्की, व्हिएतनाम येथील वस्त्रोगासाठी मोठी संधी तयार झाली आहे. अशातच कापसाचा वापर, सुताची मागणी पाकिस्तानसह बांगलादेश व भारतातही वाढली आहे.  पाकिस्तानला भारतीय कापसाची आयात अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांच्या तुलनेत नेहमी परवडणारी ठरते. पाकिस्तान दरवर्षी भारताकडून सहा ते सात लाख गाठी व १०० ते १२५ कोटी किलोग्रॅम सुताची आयात करीत होता. एवढी किंवा यापेक्षा अधिकची आयात पुढे पाकिस्तान भारताकडून करील, अशी स्थिती तयार झाली आहे.  पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांचे वित्तीय विषयांचे सल्लागार अब्दुल रझ्झाक दाऊद यांनी भारताकडून कापूस आयातीबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. तेथील कॅबिनेट व वाणिज्य आणि इतर विषयांच्या समन्वय समितीकडे याबाबाबत लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार आहे. भारताकडून आयातीसंबंधी लागू केलेले शुल्क पाकिस्तान मागे घेण्यासंबंधी कार्यवाही करीत आहे, अशी माहिती मिळाली.  सध्या भारतीय कापूस बाजार स्थिर आहे. खंडीचे दर (३५६ किलो रुई) विक्रमी स्थितीत म्हणजेच ४७ हजार रुपये एवढे आहेत. न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर ९२ सेंटवर स्थिर आहेत. भारतीय खंडीचे दर पुढे ५० हजार रुपयांवर जाऊ शकतात. कारण चीन, अमेरिकेसह इतर देशांमध्ये कापसाचे उत्पादन घटले आहे. 

भारतीय कापूस स्वस्त पडतो सध्या पाकिस्तानला अमेरिका, ब्राझीलचा कापूस ५२ हजार रुपये प्रतिखंडी पडत आहे. तर भारतीय कापूस आजघडीला ४७ हजार रुपये प्रतिखंडी पडू शकतो. या व इतर बाबी लक्षात घेता पाकिस्तानच्या कापूस जगतातील मंडळीनेच भारताकडून कापूस आयात करण्यात यावा, असे साकडे आपल्या सरकारला घातले आहे, अशी माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली. प्रतिक्रिया सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलियासह ब्राझीलचा कापूस महाग आहे. कारण तेथे उत्पादन २० ते २५ टक्के घटले आहे. भारतीय कापूस स्वस्त आहे. जून, जुलैमध्ये तेथे कापसाचे उत्पादन सुरू होते. पाकिस्तानमध्ये यंदा २० लाख गाठींचा (एक गाठ १७० किलो रुई) तुटवडा आहे.  - महेश सारडा, अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन, हरियाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com