भूलभुलैया नव्हे तर शेतकऱ्यांचा दीपस्तंभ

भूलभुलैया नव्हे तर शेतकऱ्यांचा दीपस्तंभ
भूलभुलैया नव्हे तर शेतकऱ्यांचा दीपस्तंभ

डॉ. अंकुश चोरमुले यांनी ॲग्रोवनच्या ५ मे २०१९ च्या अंकात झिरो बजेट शेतीचा भूलभुलैया हा लेख लिहिला होता. सुभाष पाळेकर यांच्या शेतीतंत्रावर विविध आक्षेप घेत, या तंत्राची शास्त्रीय कसोटीवर चिकित्सा करावी, अशी अपेक्षा त्यांनी त्या लेखात व्यक्त केली होती. डॉ. चोरमुले यांनी लिहिलेल्या लेखाचा प्रतिवाद करणारा हा लेख प्रकाशित करत आहो त. डॉ.  अंकुश चोरमुले यांनी ‘झिरो बजेट शेतीचा भूलभुलैया’ हा लेख लिहून पाळेकर कृषी तंत्रावर आक्षेप नोंदविले आहेत. डॉ. चोरमुले यांनी पाळेकरांच्या कृषी तंत्राची पडताळणी न करताच केवळ त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा लेख लिहिलेला आहे.  पाळेकर कृषी तंत्र हे मूलतः निसर्गाच्या सिद्धांतावर आधारित आहे. श्री. पाळेकर गुरुजींनी १८ वर्षे निसर्गाचा व प्रचलित सर्व शेती पद्धतींचा अभ्यास केला. त्यानंतर शेतीत वेगवेगळे प्रयोग करून ‘नैसर्गिक शेती''चे तंत्र विकसित केले. या तंत्राचे मूळ ‘देशी गाय'' हे आहे. देशी गायीच्या शेणामध्ये जमिनीला उपयुक्त कोट्यवधी जीवाणू आहेत, तर गोमुत्रात औषधी गुणधर्म आहेत. देशी गायीच्या शेण व गोमुत्राच्या साहाय्याने जीवामृत, बिजामृत, आच्छादन, वाफसा आणि पिकांचे सहजीवन या पंचसूत्रीचा वापर करून श्री. पाळेकर गुरुजी शेतकऱ्यांना शेती करावयास सांगतात. जगात या तंत्राशिवाय दुसऱ्या पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चात जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून विषमुक्त, उच्च पोषण मूल्यांनी युक्त अन्न धान्य पिकवून; जीव, जमीन, पाणी, पर्यावरण यांचे संवर्धन करून शेती करणे अवघड आहे, असा माझा मागील सात वर्षाचा अनुभव आहे. एकात्मिक पद्धतीने शेती करीत असताना या सर्व बाबींचा विचार होत नाही. हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेने १९८९ व २०१७ मध्ये देशातील विविध सहा हवामान प्रदेशांतील अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि जमीन, पाण्याचे नमुने तपासून पोषण मूल्यांचे तुलनात्मक परीक्षण केले. त्यामध्ये १० ते ७३ टक्क्यांपर्यंत कमतरता निर्माण झाल्याचे आढळून आले. हा सर्व प्रकार एकात्मिक शेतीतून घडून आलेला आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासोबत निसर्गाचीही हानी होते हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. मग शेतीच्या माध्यमातून निसर्गाचे संगोपन करण्याचा सल्ला देणे हा पाळेकरांचा अपराध आहे का? जर हे तंत्र निरुपयोगी ठरले असते तर देशातील लाखो शेतकरी या तंत्राशी जोडे गेले नसते, देशातील सहा राज्यांत या तंत्राला राजमान्यता मिळाली नसती, केंद्र सरकारचा नीती आयोग, भारतीय कृषी संशोधन परिषद, संयुक्त राष्ट्रे, जागतिक अन्न व कृषी संघटना यांनी या तंत्रास मान्यता देण्याचे धाडस केले नसते.  

खर्चाचा तपशील
खर्चाचा तपशील खर्चाची  रक्कम रु.
नर्सरी रोपे पपई व शेवगा २३३१० 
नांगरणी २०००
रोटाव्हेटर २०००
लागवड खर्च ३०००.
ठिबक संच ६०००० 
नै.निविष्ठा कच्चा माल व मजुरी ३०००० 
आंतरमशागत १७००० 
माल तोडणी मजुरी ४५००० 
पॅकिंग व वाहतूक खर्च १४०००० 
इतर घसारा १०००० 
एकूण खर्च ३३२३१०
उत्पन्नाचा तपशील
पिकाचे नाव रोपांची संख्या प्रति रोप सरासरी उत्पादन किलोमध्ये सरासरी दर प्रति किलो एकूण उत्पन्न रु.
पपई (१०*१० फूट) ७७७ ३० किलो रु.७ ७७७*३०*०७ रु. १६३०००
शेवगा(१०*१० फूट) ७७७  १२ किलो  रु.४०  ७७७*१२*४० रु. ३७२९६०
काकडी  ७०००  २ किलो  रु.८  ७०००*२*०८ रु. ११२०००
चवली व झेंडू बियाणे प्लॉट होता.
ढेमसे  ७०००  ३०  ७०००*१*३० रु.२१००००
मिरची  ३५००  ३  १५  ३५००*३*१५ रु.१५७०००
एकूण उत्पादन = रु.१०,१४,९६०

डॉ. चोरमुले यांनी शेती ‘झिरो बजेट'' कशी होऊ शकते, हा प्रश्न उपस्थित केला आहे. या तंत्रात जैवविविधता जोपासून घरच्या घरी निविष्ठा तयार करून, देशी गायीच्या शेण व गोमुत्राचा वापर करून उत्पादन खर्च कमी केला जातो. आंतरपिकाच्या माध्यमातून संपूर्ण शेतीवरील खर्च शून्यावर आणला जातो आणि मुख्य पीक हे निव्वळ नफ्याचे उत्पन्न म्हणून शिल्लक पाळले जाते. म्हणून श्री. पाळेकर गुरुजींनी यास ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती'' असे नाव दिले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव श्री. पाळेकर गुरुजींनी या तंत्रास नंतर स्वतःचे नाव दिले. दुखावलेल्या लोकांनी हा वादाचा मुद्दा बनवून तंत्राच्या बदनामीचे षड्यंत्र चालू केले. परंतु या वादाला कोणीही भीक घालत नाही म्हणून ‘झेरो बजेट'' या शब्दाला विरोध चालू केला आहे. मी मागील आठ वर्षांपासून माझी १८ एकर वडिलोपार्जित शेती, पूर्ण वेळ शेतकरी म्हणून  करतोय. पैकी चार एकर बागायत व उर्वरित जिरायत शेती आहे. रासायनिक, सेंद्रिय, एकात्मिक असे सर्व पर्याय अनुभवून पाहिल्यानंतर तीन वर्षांपूर्वी पाळेकर कृषी तंत्राचा अवलंब केला. तेव्हापासून माझी शेती शाश्वत झाल्याचा माझा अनुभव आहे. आजही माझ्या शेतात पाळेकर कृषी तंत्राचे दोन मॉडेल्स उभे आहेत. आक्षेप घेणाऱ्यांनी माझ्या शेतीत येऊन नमुने तपासावेत, माझा शेतीचा वार्षिक ताळेबंद तपासावा. या तंत्राच्या साहाय्याने शेती केल्यामुळे कमी क्षेत्रात, कमी पाण्याचा वापर करून, कमी खर्चात जास्त पिके घेऊन शेतीचा खर्च शून्यावर आणून, शाश्वत उत्पादन घेता येते. हा माझा आजचा अनुभव आहे.  श्री. पाळेकर गुरुजींनी मांडलेला नैसर्गिक शेताचा सिद्धांत निर्विवाद सिद्ध झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी या तंत्राचे परिपूर्ण पालन केले आहे, त्यांना अपेक्षित परिणाम मिळाले, ज्यांनी चुका केल्या त्यांना अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. त्यामुळे संपूर्ण तंत्र चुकीचे आहे असा निष्कर्ष निघू शकत नाही. हा नियम कोणत्याही पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास लागू आहे. आधुनिक शेती पद्धतीत शाश्वत उत्पादन मिळाले असते तर आज शेती आणि शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली नसती. अधुनिक कृषी शास्त्रात स्वतःला कृषी पंडित, तज्ज्ञ समजणाऱ्या लोकांनी आत्मचिंतन करण्याची आवश्‍यकता आहे.   माझ्या शेतातील आज उभ्या असलेल्या पिकांचा ताळेबंद सादर करीत आहे. आक्षेपकर्त्यांनी तो केव्हाही तपासून पाहावा.

  • शेत जमीन गट क्र. ६ मौजे. खपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव. शेत्र. ७० आर.
  • मुख्य पिके : शेवगा व पपई लागवड दि. १० मार्च २०१८. 
  • आंतरपिके : पहिले ३ महिने काकडी, चवळी, झेंडू. पहिल्या ३ महिन्यांनंतर ढेमसे, मिरची
  • माल खरेदी करणारे व्यापारी 
  •  क्र. १. हिंमत गंजी भोई आणि कंपनी. नवीन भाजी मार्केट जळगाव. मो. नं. ९३७०००२१६४
  • क्र. २ जळगाव नँचरल. रोटरी हॉल रोड महाबळ जळगाव मो. नं. ९३७०५४४३०१
  • वरील उत्पन्नातून खर्च वजा जाता मला ६ लाख ८२ हजार ६५० रुपये निव्वळ नफा झाला. ७० गुंठ्यांत एका वर्षात एवढा नफा एकात्मिक शेती करणाऱ्यास येतोच असे नाही. यात आंतरपिकातून संपूर्ण वर्षाचा त्या शेतावरील खर्च निघाला. म्हणून ‘झिरो बजेट'' नाव दिले आहे. तरीही ज्याला कुणाला शंका असेल त्याने शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी करू शकता.
  •  ः ८००७०५७५०० (लेखक पाळेकर तंत्राने शेती करणारे शेतकरी आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com