नगर जिल्ह्यात २४ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम वेगात सुरू आहे. सोमवारपर्यंत (ता. ४) २४ हजार २९७ हेक्टर क्षेत्रावरील ७८ हजार २९७ शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.  

जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. दोन दिवसांत काही भागात उघडीप दिली असली तरी कोपरगाव, राहुरी तालुक्यांच्या काही भागांत सोमवारी जोरदार पाऊस झाला. सतत होणाऱ्या पावसाने खरीप व रब्बीमधील बहूतांश पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे करण्याचे काम वेगात सुरू असल्याचे सांगितले जात असताना अजूनही कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी अनेक गावांत पोचले नसल्याची अहवालावरून दिसून येत आहे. प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सोमवारपर्यंत १२९४ गावांतील २४ हजार २९७ हेक्टर क्षेत्रावरील ७८ हजार २९७ शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर ५७ हजार १८१ हेक्टरवरील ७८ हजार शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.  

अजून काही गावे दूरच  जिल्हा कृषी विभागाने दिलेल्या अहवालात प्राथमिक माहितीनुसार १५१९ गावांतील ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांचे साधारण चार लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे नमुद केले आहे. सोमवारपर्यंत झालेल्या पंचनाम्याच्या अहवालानुसार १२९५ गावांतील ७८ हजार २९७ शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे झाले असल्याचे सांगण्यात आले. असे असेल तर पाच ते सहा दिवस होऊनही अजून कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी अजूनही २२४ गावांत पोचलेलाच नाही असेच प्राप्त अहवालानुसार दिसून येत आहे. झालेल्या नुकसानीचे २४ तासांत पंचनामे होणे गरजेचे आहे. दोन दिवसांपासून ज्या भागात पावसाची उघडीप आहे तेथे कापूस वेचणीला सुरवात झाली आहे. तेथे नुकसान कसे ग्राह्य धरणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.    सोमवारपर्यंत झालेले पंचनामे (हेक्टर क्षेत्र व कंसात शेतकरी) नगर ः १६८९ (२९३७),पाथर्डी ः २७९१ (३०८८), पारनेर ः २७०० (३६००),कर्जत ः ११० (२९०), श्रीगोंदा ः १११९ (१६५५), जामखेड ः ५१७ (११५१), श्रीरामपूर ः २२३५ (८१५०),नेवासा ः १९४० (२८२४),शेवगाव ः १८८७ (२४२८),राहुरी ः ५४०० (७३००), संगमनेर ः ४७६ (११४२),अकोले ः ६२० (१३६२), कोपरगाव ः २१७५ (२७८६), राहाता ः ६३५ (७२०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com