नगरचे पाणी बीड नेणार ही फक्त अफवा ः पंकजा मुंडे

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

नगर  : मुळा धरणातून बीडला पाणी नेणार, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खोडसाळ प्रचार आहे. ही पसरवलेली अफवा आहे. नगर जिल्ह्यातून पाण्याचा एक थेंबही बीडला नेणार नाही, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. 

भाजप- शिवसेना महायुतीच्या पाथर्डी, राहुरी व नेवासे मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारसभेत पांढरी पूल (ता. नेवासे) येथे पंकजा मुंडे यांची शनिवारी सभा झाली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजप उमेदवार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठल अभंग, अशोक गायकवाड या वेळी उपस्थित होते. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, की सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय युती शासनाने घेतला आहे. धनगर समाजालाही आदिवासींच्या सवलती लागू केल्या आहेत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून धनगर समाजाची दिशाभूल करण्याचे कारस्थान रचले जात आहे. नगर जिल्ह्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. भविष्यात आर्थिक विकास साधून बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचा हे भाजपचे स्वप्न आहे. कलम ३७० हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही, तर आपल्या संस्कार व स्वाभिमानाचा मुद्दा आहे. राष्ट्राच्या अभिमानासाठी भाजपचा जन्म झाल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहा. या वेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी प्रास्ताविक केले. खासदार डॉ. विखे पाटील, आमदार मुरकुटे, रिपाइंचे अशोक गायकवाड, शरद बाचकर यांचीही भाषणे झाली.  

विठ्ठल लंघे यांचा दुसऱ्यांदा भाजपप्रवेश  कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. ‘राष्ट्रवादी’ने ऐनवेळी लंघे यांना उमेदवारी नाकारून ‘क्रांतिकारी’चे उमेदवार शंकरराव गडाख यांना पाठिंबा दिल्याने नाराज झालेल्या लंघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com