परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस खरेदी बाकी

परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळाकडे नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यात विना व्यत्यय खरेदी करता यावा, यासाठी सात तालुक्यांतील २५ जिनिंग- प्रेसिंग कारखान्यांत तात्पुरते निवारे (मॉन्सून शेड) उभारण्यात आले आहेत.
In Parbhani, 25,000 farmers are left to buy cotton
In Parbhani, 25,000 farmers are left to buy cotton

परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळाकडे नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यात विना व्यत्यय खरेदी करता यावा, यासाठी सात तालुक्यांतील २५ जिनिंग- प्रेसिंग कारखान्यांत तात्पुरते निवारे (मॉन्सून शेड) उभारण्यात आले आहेत. तर, दोन ठिकाणच्या जिनिंग कारखान्यांमध्ये निवारे उभारण्याचे काम सुरु आहे’’, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यातील नोंदणीकृत ४१ हजार २२१ शेतकऱ्यांपैकी आजवर १६ हजार १०७ शेतकऱ्यांच्या ४ लाख ८५ हजार ८०२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. अद्याप २५ हजार ११४ शेतकरी कापसाच्या मोजमापाच्या प्रतिक्षेत आहेत. लॉकडाऊनमुळे यंदा शासकीय कापूस खरेदी पावसाळ्यापर्यंत लांबली आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील विविध ठिकाणच्या २७ जिनिंग कारखान्यांमध्ये हमीभाव कापूस खरेदी केंद्रे आहेत. उन्हाळ्यामध्ये या केंद्रावर कापूस साठविण्यासाठी फारशा अडचणी आल्या नाहीत. परंतु, पाऊस सुरु झाल्यापासून कापूस खरेदी प्रक्रियेत सातत्याने अडथळे येत आहेत. केंद्रावर निवारे नसल्यामुळे कापूस भिजून मोठे नुकसान देखील झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बाजार समित्यांना तात्पुरते निवारे उभारण्याचे निर्देश दिले होते.

आजवर परभणी येथील ६ जिनिंग कारखाने, जिंतूर येथील २, सेलू येथील ३, मानवत येथील ४, पाथरी येथील ३, सोनपेठ येथील २, गंगाखेड येथील ५ जिनिंग अशा २५ जिनिंग कारखान्यात निवारे उभारण्यात आले आहेत. पूर्णा येथील दोन जिनिंग कारखान्यात निवारे उभारण्याचे काम सुरु आहे. मोजमाप राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाच्या पडताळणीचे काम सुरु आहे. ५ लाख ४४ हजार क्विंटल कापूस शिल्लक आहे. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक अन्य कामासोबत पडताळणीचे काम करत असल्यामुळे त्यासाठी वेळ लागत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे सुरवसे यांनी सांगितले.

संदेश आल्यानंतरच कापूस विक्रीसाठी आणा

शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. परंतु, अद्याप मोजमाप राहिलेले आहे, अशा शेतकऱ्यांनी बाजार समितीकडून मोबाईलवर संदेश प्राप्त झाल्याशिवाय कापुस विक्रीसाठी आणू नये. अन्यथा, वाहनांस बाजार समितीकडून टोकन देण्यात येणार नाही. टोकनाशिवाय पणन महासंघ कापुस खरेदी करणार नाही. सध्या अनेक जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीमध्ये शेड उभारणीचे काम सुरु आहे. सीसीआय कापूस खरेदी सुरु ठेवेल, तोपर्यंत पणन महासंघाची खरेदी सुरु राहील. शेतकऱ्यांनी प्रशासनास सहाकर्य करावे, असे आवाहन पणन महासंघाचे संचालक पंडीतराव चोखट, प्रभारी विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेणके यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com