परभणी जिल्ह्यात पीक कापणीचे होणार अडीच हजारांवर प्रयोग

परभणी  जिल्ह्यात पीक कापणीचे होणार अडीच हजारांवर प्रयोग
परभणी जिल्ह्यात पीक कापणीचे होणार अडीच हजारांवर प्रयोग

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) खरीप हंगामात कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांमार्फत २ हजार ५१२ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळण्याकरिता उत्पादनाचे वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढण्यासाठी सोयाबीन आणि कपाशी यांच्या पीककापणी प्रयोगांच्या संख्येत वाढ केली आहे. यंदा प्रथमच जिल्ह्यातील ३८ मंडळांमध्ये सोयाबीन आणि कपाशीचे पीक कापणी प्रयोग घेण्यात येतील. 

दरम्यान, ग्रामसेवक संघटनेने पीक कापणी प्रयोगावर घातलेल्या बहिष्कारामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त प्रयोगाचा ताण वाढल्याने त्यांच्यामध्ये धुसफुस सुरू आहे. गतवर्षीपर्यंत दोन किंवा तीन महसूल मंडळांच्या गटांमध्ये सोयाबीनचे एकत्रित १२ पीक कापणी प्रयोग केले गेले. त्यामुळे एखाद्या मंडळामध्ये आलेल्या अधिक उत्पादनामुळे सरासरी उत्पादनात वाढ होत असे. त्याचा फटका प्रत्यक्षात कमी उत्पादन आलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना बसत होता. 

उत्पादनात घट येऊनही विमा कंपनीने पीकविमा परतावा नाकारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या प्रश्‍नी संघटनांनी आंदोलने केली. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यंदा जिल्ह्यातील ३८ मंडळांमध्ये सोयाबीन आणि कपाशीच्या प्रत्येकी ४५६ पीक कापणी प्रयोग होतील. त्याचप्रमाणे यंदा मुगाचे ३३६, उडीद २०२, तूर १९२, ज्वारी २३४, बाजरी १९८, भात १३८, सूर्यफूल १६८, ऊस पूर्वहंगामी १६८, ऊस सुरू ५२, ऊस खोडवा ३६ असे एकूण २ हजार ५१२ पीक कापणी प्रयोग होतील.

यंदा यंत्रणानिहाय पीक कापणी प्रयोगामध्ये महसूल यंत्रणेतर्फे ४५४ पीक कापणी प्रयोग, जिल्हा परिषद यंत्रणेतर्फे १ हजार १४ आणि कृषी विभागामार्फत १ हजार ४४ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन आहे. 

गतवर्षी एकूण २ हजार ३८६ पीककापणी प्रयोग घेण्यात आले होते. त्यात सोयाबीनचे ३८० आणि कपाशीचे ३१२ प्रयोग झाले. ग्रामसेवक संघटनेचा बहिष्कार कायम असल्याने अन्य दोन यंत्रणांवर अतिरिक्त पीक कापणी प्रयोगाचा ताण वाढला  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com