परभणी जिल्ह्यात भूजल पातळीत २.८४ ते ८.४३ मीटरने वाढ

In Parbhani district, the groundwater level increased by 2.84 to 8.43 meters
In Parbhani district, the groundwater level increased by 2.84 to 8.43 meters

परभणी : परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील भूजल पातळीमध्ये गतवर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत यंदा जानेवारीत २.८४ ते ८.४३ मीटरने वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे जिल्ह्यातील निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता तुलनेने कमी राहील, असे सूत्रांनी सांगितले.

सन २०१४ ते २०१८ या पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत गतवर्षीच्या जानेवारीत जिल्ह्यातील मानवत, पाथरी, पालम हे तीन हे तालुके वगळता अन्य सहा तालुक्यातील भूजल पातळीत उणे ०.१० ते उणे ४.४९ मीटरने घट झाली होती. जिल्ह्यात २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाले, नद्यांना पूर आले. लघू, मध्यम, मोठे प्रकल्प भरले. गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांसह अन्य नद्यांवरील बंधारे भरले. 

जायकवाडी, सिद्धेश्वर, माजलगाव या मोठ्या प्रकल्पासह करपरा, मासोळी या मध्यम प्रकल्पांच्या कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी आवर्तने सोडण्यात आली. त्यामुळे विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. सन २०१५ ते २०१९ या पाच वर्षांतील जानेवारी महिन्यातील भूजल पातळीच्या तुलनेत यंदा १.८५ मीटर ते ५.४४ मीटरने वाढ झाली आहे. गतवर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदा २.८४ ते ८.४३ मीटरने वाढ झाली आहे.

गंगाखेड तालुक्यातील भूजल पातळीत सर्वांत कमी २.८४ मीटर, तर सोनपेठ तालुक्यातील भूजल पातळीत सर्वाधिक ८.४३ मीटरने वाढ झाली आहे.

भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाईची समस्या तुलनेने कमी जाणवणार आहे. परंतु भूगर्भातून सुरू असलेल्या बेसुमार उपशावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी प्रवाही पध्दती ऐवजी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे  सूत्रांनी सांगितले.

जानेवारीतील तुलनात्मक भूजल पातळी (मीटरमध्ये)

तालुका २०१९ २०२०  वाढ
परभणी ११.११ ७.२४ ३.८७
जिंतूर १०.०२  ७.११  २.९१
सेलू १३.९७  ७.६१ ६.३६
मानवत ७.८८ ३.८५  ४.०३
पाथरी १०.०३ ६.७९ ३.२४
सोनपेठ १२.१० ३.६७  ८.४३
गंगाखेड १०.९१ ८.०७ २.८४
पालम ६.९६ ३.६७ ३.२९
पूर्णा ८.९४ २.७१ ६.९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com