परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुधाची साडेसहा कोटी रुपयांवर देयके थकीत

दुष्काळी स्थितीत दूध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळाला. परंतु वेळेवर देयके अदा केली जात नसल्यामुळे अडचणी येत आहेत. दूध संकलन, पुरवठा करणाऱ्या संस्थाचे कमिशन थांबवून आर्थिक कोंडी केली जात आहे. - भगवान सावंत, संचालक, दुग्ध संकलन संस्था, जवळा बाजार, जि. हिंगोली.
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुधाची साडेसहा कोटी रुपयांवर देयके थकीत
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुधाची साडेसहा कोटी रुपयांवर देयके थकीत

परभणी :  शासकीय दूध योजनेतून परभणी येथील दुग्धशाळेअंतर्गत संकलित करण्यात आलेल्या दुधाची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नाही. गेल्या दोन महिन्यांत संकलित केलेल्या दुधाची तब्बल ६ कोटी ९४ लाख १७ हजार ७५० रुपयांची देयके थकीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देयके देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील दूध उत्पादकांची परवड होत असून, त्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

शेतकरी, दूध उत्पादकांना शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दुष्काळी स्थितीत उत्पन्नाचा पर्यायी स्रोत मिळाला आहे. या भागात सहकारी दूध संघ नसल्यामुळे शासकीय दुग्धशाळेचा शेतकऱ्यांना आधार आहे; परंतु एप्रिल महिन्यापासून दुधाची देयके देण्यासाठी विलंब लावला जात आहे. दर दहा दिवसांनी दुधाची देयेके मिळणे अपेक्षित आहे; परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने दूध उत्पादकांना दोन-दोन महिने देयकांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

दुधाळ पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी सरकी पेंड, चारा विकत घेणे अशक्य झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय बंद केल्याची स्थिती आहे. त्यामुळे दुग्धशाळेतील दूध संकलनात साडे तीन लाख लिटरहून अधिक घट झाली आहे.

२८ एप्रिल ते १० मेपर्यंतच्या संकलित दुधाची देयके अदा करण्यासाठी २ कोटी ८९ लाख रुपये निधी आला आहे. तो बुधवार (ता. १०) पासून दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या खात्यांवर जमा केला जात आहे. परंतु ११ मे ते १० जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत संकलित २७ लाख ७९ हजार ७१० लिटर दुधाची तब्बल ६ कोटी ९४ लाख १७ हजार देयके निधीअभावी थकीत आहेत.

दुग्धशाळेतील यंत्रसामग्रीसाठी लागणारे इंधन, वीजबिल, देखभाल दुरुस्तीसाठीदेखील वेळेवर निधी उपलब्ध होत नाही. सहकारी दूध उत्पादक संस्थांचे मार्च महिन्यापासूनचे कमिशनदेखील थकले आहे. शासन, प्रशासनाच्या कमालीच्या अनास्थेमुळे दूध उत्पादक, दूध संकलक व पुरवठा सहकारी संस्थाची हेळसांड सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com