परभणीत ज्वारीचा कडबा प्रतिशेकडा २२०० ते ३००० रुपये

परभणीत ज्वारीचा कडबा प्रतिशेकडा २२०० ते ३००० रुपये
परभणीत ज्वारीचा कडबा प्रतिशेकडा २२०० ते ३००० रुपये

परभणी ः रब्बी ज्वारीच्या नवीन कडब्याची आवक सुरू झाल्यामुळे परभणी येथील जनावरांच्या बाजारातील (खंडोबा बाजार) कडब्याचे दर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ५०० ते ६०० रुपयांनी कमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. १२) ज्वारीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा सरासरी २२०० ते ३००० रुपये दराने विक्री सुरू होती. सध्या कडब्याचे दर कमी झाले असले तरी मे महिन्यात दर वाढतील, असे कडबा मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक पशुधनासाठी वैरण म्हणून प्रामुख्याने रब्बी ज्वारीचा कडबा वापरतात. कमी पावसामुळे उद्भभवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे २०१८ च्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात ५३ टक्क्याची घट झाली. जिल्ह्यात ८३ हजार ९७० हेक्टरवर (४७ टक्के) ज्वारीच पेरणी झाली होती. परंतु जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे अन्नधान्य तसेच कडबा उत्पादनात घट झाली. 

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यातील तसेच जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील काही गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले. त्यामुळे ज्वारीचे पीक चांगले आले. सध्या परभणी येथील जनावरांच्या बाजारामध्ये नवीन कडब्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे कडब्याच्या दरात फेब्रुवारीच्या तुलनेत प्रतिशेकडा ५०० ते ६०० रुपयांनी कमी झाले आहेत. 

फेब्रुवारीमध्ये ज्वारीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा २८०० रेत ३५०० रुपये पर्यंत वाढले होते. हिरव्या मक्याच्या पेंढ्याचे दर प्रतिशेकडा १३०० ते १५०० रुपये होते. उसाचे दर प्रतिशेकडा २२०० ते २५०० रुपये होते. सध्या येथील कडबा मार्केटमध्ये परभणी तालुक्यातील गावांतून ज्वारीच्या कडबा, मका, उसाची आवक होत आहे. वाढ्याची आवक मात्र बंद झाली आहे. 

शुक्रवारी (ता. १२) ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्यांची प्रतिशेकडा २२०० ते ३००० रुपये दराने, हिरव्या मक्याची प्रतिशेकडा ८०० ते १००० रुपये दराने, उसाची प्रतिशेकडा १८०० ते २२०० रुपये दराने विक्री सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com