परभणीत खरिपात सव्वापाच लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज 

परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात घट तर कपाशीच्या क्षेत्रात वाढ गृहीत धरण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
In Parbhani kharif, sowing is estimated on five lakh hectares
In Parbhani kharif, sowing is estimated on five lakh hectares

परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात घट तर कपाशीच्या क्षेत्रात वाढ गृहीत धरण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात गतवर्षीच्या खरिपात ५ लाख ३३ हजार ८८० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा खरिपाच्या क्षेत्रात ३ हजार १२० हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे तीनपट वाढ झाली आहे. परंतु यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत १७ हजार ३९० हेक्टरने घट होण्याचा अंदाज आहे. 

कपाशीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १६ हजार ३५ हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. कडधान्यामध्ये तुरीच्या क्षेत्रात ४ हजार ६५९ हेक्टरने, मृगाच्या क्षेत्रात सव्वाशे हेक्टरने, उडिदाच्या क्षेत्रात अडीचशे हेक्टरने वाढ अपेक्षित आहे. तृणधान्यामध्ये ज्वारीच्या क्षेत्रात ४९२ हेक्टरने, बाजरीच्या क्षेत्रात १०४ हेक्टरने घट होण्याचा अंदाज आहे. 

हळदीच्या क्षेत्राची नोंद आवश्यक  गेल्या आठ ते दहा वर्षांत परभणी जिल्ह्यातील हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. पूर्णा, परभणी, जिंतूर तसेच अन्य तालुक्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहे. हळद लागवड वाढल्यामुळे खरीप पिकांच्या क्षेत्रात घट झाली. खरीप पीक पेऱ्यासोबत हळद लागवडीची नोंद घेतल्यास हळदीचे क्षेत्र निश्चित होईल. 

३२ हजार टन खते उपलब्ध  यंदाच्या खरिपात जिल्ह्यासाठी विविध ग्रेडच्या १ लाख ५१ हजार २०० टन खताची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ९१ हजार १७० टन खतसाठा मंजूर झाला. एप्रिल महिन्यात पहिल्या पंधरावाड्यात ११ हजार ८९२ टन खतसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षीचा २४ हजार ७७१ टन खत शिल्लक होता. त्यामुळे ३६ हजार ६६३ टन खते उपलब्ध होती. त्यातून ३ हजार ८४७ टन खताची विक्री झाल्याने ३२ हजार ८१६ टन खतासाठा शिल्लक आहे. 

कपाशी बियाण्याचे साडेअकरा लाख पाकिटांची मागणी  कपाशीच्या बीजी २ वाणाच्या बियाणाच्या ११ लाख ५५ हजार पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, कपाशी आदी पिकांचे मिळून एकूण ८७ हजार १७१ क्विंटल बियाणाची मागणी महाबीज आणि खासगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे. आजवर महाबीजकडून ८८५ क्विंटल बियाणाचा पुरवठा करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे, खते आदी निविष्ठा उपलब्ध  करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. खते आणि बियाणे उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा सुरू झाला आहे.  - हनुमंत ममदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, परभणी. 

परभणी जिल्हा तुलनात्मक खरीप क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
पीक २०१९-२० (पेरणी क्षेत्र) २०२०-२१ (प्रस्तावित क्षेत्र)
सोयाबीन २४२३९० २२५०००
कापूस २०६९६५ २२३०००
तूर ४६३४१ ५१०००
मूग २४८७६ २५०००
उडीद ७७१२ ८०००
ज्वारी ४९९२ ४५००
बाजरी ६०४ ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com