परभणीत सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी पिकांचा विमा परतावा मंजूर

परभणीत सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी पिकांचा विमा परतावा मंजूर
परभणीत सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी पिकांचा विमा परतावा मंजूर

परभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २०१८ च्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी या चारापिकांच्या नुकसानीबद्दल परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १४ मंडळांमधील ३४ हजार २४१ शेतकऱ्यांना १९ कोटी ३८ लाख ६३ हजार २७९ एवढा पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला. परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत आहे. तूर पिकांच्या नुकसानीबद्दल मंजूर झालेला २५ टक्के मध्य हंगाम विमा परताव्याची रक्कमदेखील खात्यावर जमा होत आहे. पीककापणी प्रयोगातील उत्पादन अहवालानंतर कापूस पिकासाठी विमा परतावा, तसेच तुरीसाठी अंतिम परतावा मंजूर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५ लाख ८० हजार ८८५ विमा प्रस्ताव सादर करत एकूण ३ लाख ४५ हजार ९४६ हेक्टरवरील सोयाबीन, मूग, उडिद, कापूस, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी विमा कवच घेतले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकूण २८ कोटी २० लाख रुपये विमा हप्ता कंपनीकडे भरला होता.

२०१८ च्या खरिपातील पेरणीनंतर आलेल्या पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सर्वच तालुक्यांतील खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. इफ्फको टोकियो जनरल इन्शुरंस कंपनीने शनिवारी (ता. ९) कृषी विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाकडे पीकविमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पाठविल्या आहेत.

त्यानुसार बॅंकांमार्फत विमा प्रस्ताव सादर केलेल्या ३ हजार ३२० शेतकऱ्यांना २ कोटी १३ लाख ६९ हजार रुपये आणि सामुदायिक सेवा केंद्रामार्फत (सीएससी) विमा प्रस्ताव सादर केलेल्या ३० हजार ९२१ शेतकऱ्यांना १७ कोटी २४ लाख ९३ हजार ७३७ असे एकूण ३४ हजार २४१ शेतकऱ्यांना १९ कोटी ३८ लाख ६३ हजार २७९ रुपये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.

तूर पिकाच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील सर्व ३८ मंडळांतील ६५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मध्य हंगामी विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे. पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर तुरी विमासंरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना आणखी अंतिम विमा परतावा मिळू शकतो. कापसाच्या पीककापणी प्रयोगाच्या अहवालातील निष्कर्षानुसार परतावा मंजूर होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

खरीप पीकविमा परतावा मंजूर झालेली महसूळ मंडळे सोयाबीन ः परभणी, पेडगाव, जांब (सर्व ता. परभणी), सेलू, चिकलठाणा बु., कुपटा, वालूर, देऊळगाव गात (सर्व ता. सेलू), मानवत, केकरजवळा, कोल्हा (सर्व ता. मानवत). मूग ः बामणी (ता. जिंतूर), चिकलठाणा बु.(ता. सेलू), मानवत (ता. मानवत), कात्नेश्वर (ता. पूर्णा).  ज्वारी ः माखणी (ता. गंगाखेड)  बाजरी ः हादगाव बु. (ता. पाथरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com