परदेशी यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी 

कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव आणि महापालिका रुग्णालयात सुरु असलेला सावळागोंधळ या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली.
Praveen pardeshi
Praveen pardeshi

मुंबई: कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव आणि महापालिका रुग्णालयात सुरु असलेला सावळागोंधळ या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने परदेशी यांच्यासह मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड आणि जयश्री भोज यांनाही हटवले आहे. 

एकीकडे राज्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यातील प्रशासनाची धावपळ सुरु असताना दुसरीकडे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनात मोठे फेरबदल केले. त्यात प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करून त्यांची नियुक्ती मंत्रालयात नगरविकास विभागात करण्यात आली आहे. 

मुंबईत कोरोनाचे संकट गडद होत असताना स्थिती हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. मुंबईत जीवनावश्यक वस्तू, औषध दुकानांव्यतिरिक्त दुकाने उघडण्याबाबतचा आदेश काढताना पालिका आयुक्तस्तरावर गोंधळ पाहायला मिळाला. त्याचाही फटका परदेशी यांना बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पालिका प्रशासनात आणखीही मोठे बदल करताना ठाणे पालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांची तसेच मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची मुंबई पालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आबासाहेब जऱ्हाड यांची मदत आणि पुनर्वसन सचिवपदी बदली तर जयश्री भोज यांची महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची वित्त विभागात नेमणूक करण्यात आली आहे. तर मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांची बदली सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com