कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे शिक्कामोर्तब

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये कृषी कायदे मागे घेतले. यावर चर्चेची विरोधकांची मागणी मान्य न झाल्यामुळे जोरदार गोंधळ होऊन कामकाजही विस्कळित झाले.
Parliament seals withdrawal of agricultural laws
Parliament seals withdrawal of agricultural laws

नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये कृषी कायदे मागे घेतले. यावर चर्चेची विरोधकांची मागणी मान्य न झाल्यामुळे जोरदार गोंधळ होऊन कामकाजही विस्कळित झाले. कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक चर्चेविनाच आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्यानंतर ‘लोकशाही प्रक्रियेच्या चिंधड्या उडविल्या’ अशा शब्दांत विरोधकांनी सरकारवर तोफ डागली. 

कृषी कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणण्याचे सरकारतर्फे आधीच जाहीर करण्यात आले होते. दोन्ही सभागृहांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्येही कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक २०२१, मांडण्याचा आणि चर्चेअंती मंजूर करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष कामकाजादरम्यान चर्चा न होताच विधेयक संमत झाले. 

लोकसभेच्या कामकाज विषयक समितीच्या बैठकीमध्ये या विधेयकावर चर्चा व्हावी यासाठी विरोधक आग्रही होते. कायदे रद्द व्हावेत, पण त्यावर चर्चा हवी. विरोधी पक्षांना यावर म्हणणे मांडायची संधी मिळावी, अशी मागणी लोकसभेच्या कामकाज विषय समितीच्या बैठकीत विरोधकांकडून झाली. तर, कृषी कायद्यांवर खुद्द पंतप्रधानांनी माफी मागून कायदे रद्द करण्याची घोषणा केली असल्याने चर्चेची आवश्यकता नाही, असा सरकारचा पवित्रा होता. यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपल्याने, त्याचे पडसाद सभागृहात उमटले. 

काँग्रेसतर्फे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक होऊन त्यात दोन्ही सभागृहांमध्ये कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक चर्चेद्वारेच मंजूर केले जावे यावर द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, मुस्लिम लीग, एमडीएमके, लोकतांत्रिक जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स तसेच रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी या ११ पक्षांनी सहमती व्यक्त केली. तत्पूर्वी, राहुल गांधींनी आज ‘संसद मे अन्नदाता के नाम का सूरज उगाना है,’ असे ट्विट करून काँग्रेसचा मनोदय आधीच स्पष्ट केला होता. तृणमूल काँग्रेसने काल जाहीर केल्याप्रमाणे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या बैठकीकडे पाठ फिरविणे पसंत केले. विशेष म्हणजे समाजवादी पक्षानेही काँग्रेसच्या या बैठकीला जाण्याचे टाळले. तत्पूर्वी, कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील खासदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली संसद भवनाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने कली. राहुल गांधीही यात सहभागी झाले होते. दरम्यान, कृषी कायदे रद्द करण्याच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्याही खासदारांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. 

गोंधळातच विधेयक मंजूर  गोंधळामुळे संतप्त झालेले सभापती ओम बिर्ला यांनी अशा वातावरणात चर्चा करणार का, असा सवाल विरोधकांना केला. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी यावेळी सरकावर लोकशाही प्रक्रियेच्या चिंधड्या उडविल्या जात असल्याची तोफ डागली. २०१४ पासून सहा कायदे मागे घेण्यात आले असून त्यावर चर्चा झाली असताना आताच चर्चा नाकारण्याचे कारण काय, असा त्यांचा सवाल होता. मात्र, सभापतींनी आवाजी मतदान घेऊन विधेयक मांडण्यास परवानगी दिली. त्यानंतर गोंधळामध्येच आवाजी मतदानाने विधेयक संमतही करण्यात आले. यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

गोंधळानेच सुरुवात  लोकसभेमध्ये नव्या खासदारांचा शपथविधी आणि दिवंगत खासदारांना श्रद्धांजली झाल्यानंतर कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावर चर्चा घ्यावी या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासात गोंधळाची चिन्हे दिसू लागताच सभापतींनी कामकाज तहकूब केले. दुपारी बाराला पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक मांडायला सुरुवात करताच विरोधी खासदारांनी चर्चेच्या मागणीसाठी घोषणा द्यायला सुरुवात केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com