अधिवेशन गुंडाळण्याच्या हालचाली

अधिवेशन गुंडाळण्याच्या हालचाली
अधिवेशन गुंडाळण्याच्या हालचाली

नवी दिल्ली : संसदेत विरोधकांचा गोंधळ चालूच रहाण्याची दाट चिन्हे असल्याने अर्थसंकल्पी अधिवेशनाचा कणा मानले जाणारे वित्त विधेयक व अर्थविषय तरतुदींचे विधेयक लोकसभेत प्रचंड गदारोळात मंजूर केल्यावर अधिवेशन गुरुवारी (ता. १६) किंवा पुढच्या आठवड्याच्या प्रारंभी गुंडाळण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी फारसे अनुकूल नाहीत; मात्र कामकाज चालणारच नसेल, तर पुढच्या पंधरा दिवसांत अधिवेशन चालविण्यापेक्षा सरकारची कल्याणकारी धोरणे जनतेपर्पंत नेण्यासाठी खासदारांना मोकळे का करत नाही, असा प्रश्‍न सत्तारूढ खासदारच विचारू लागले आहेत.

सलग नवव्या दिवशी गुरुवारी (ता. १५) संसदेचे कामकाज ठप्प झाले. लोकसभेत एक विधेयक गोंधळात मंजूर केले गेले व राज्यसभेत कामकाजच झाले नाही. उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारल्याने विरोधकांच्या शिडात हवा भरली आहे. दोन्ही सभागृहांत गदारोळाची परंपरा आजही कायम राहिली. अधिवेशनाचा उत्तरार्ध सुरू झाल्यापासून लोकसभेचे कामकाज प्रथम दुपारी बारापर्यंत व नंतर दिवसभरासाठी तर राज्यसभा दुपारी दोन व नंतर दिवसभरासाठी तहकूब होणे हा प्रघातच पडून गेल्याचे चित्र आहे.

आंध्र प्रदेशाच्या विशेष पॅकेजच्या मुद्द्यावरून तेलुगू देसम संतप्त आहे, तर तेलंगणा राष्ट्र समिती, अण्णा द्रमुक व शिवसेनेचे खासदारही गोंधळात उतरले आहेत. राज्यसभेत त्यांची संख्या कमी असल्याची कमतरता अण्णा द्रमुक, समाजवादी पक्ष व अखेरीस कॉँग्रेस भरून काढते. आज तेलुगू देसमचे राजीनामा दिलेले मंत्री वाय. एस. चौधरी यांना सभापतींनी बोलण्याची परवानगी दिली होती. त्यांनी आंध्र प्रदेशावरील अन्यायाबाबत भाषण सुरू केले. मात्र २०१४ मध्ये झालेल्या राज्याच्या विभाजनाच्या मुद्द्यावर त्यांची गाडी घसरली आणि कॉँग्रेस सदस्य संतापले. त्यानंतर नेहमीचा गदारोळ सुरू झाला.

अधिवेशनाचा कालावधी पाच एप्रिलपर्यंत असला तरी ते असा पद्धतीने चालणार असेल तर त्यापेक्षा आम्हाला आमच्या मतदारसंघांत जाऊ द्या, असा आग्रह अनेक भाजप खासदारांनी धरला आहे. राज्यसभेत एक कामगारविषयक विधेयक मंजूर होणे अत्यावश्‍यक असल्याने वरिष्ठ सभागृहात उद्याच्या उद्या अधिवेशन तहकुबीची शक्‍यता कमी दिसते, असे शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कामकाज गुंडाळण्याबाबत बोलताना सूचकपणे नमूद केले.

अधिवेशन म्हणजे तमाशा माकपने हे अधिवेशन म्हणजे तमाशा किंवा नाटकबाजी झाल्याची जोरदार टीका केली आहे. वित्त विधेयक गोंधळात व चर्चा न होता मंजूर करणे हा लोकशाहीचा अपमान असल्याचे माकप नेते महंमद सलीम यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com