औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात १५ कारखान्यांचा सहभाग

औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील २५ पैकी १५ कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरवात केली आहे.
Participation of 15 mills in Aurangabad, Jalna and Beed districts
Participation of 15 mills in Aurangabad, Jalna and Beed districts

औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील २५ पैकी १५ कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरवात केली आहे. अपवाद वगळता क्षमतेपेक्षा कमीच दैनंदिन ऊस गाळप करणाऱ्या या कारखान्यांनी ९ लाख ९२ हजार टन उसाचे गाळप करत ८ लाख १६ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले’’, अशी माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाचा हंगाम जवळपास महिनाभरापेक्षा जास्त काळ उशिराने सुरू झाला आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम सुरू होणेही त्याला अपवाद नाही. ऑक्‍टोबरच्या मध्यन्हानंतर व नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात काही कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरवात केली आहे. एकीकडे एफआरपीचा प्रश्‍नी ऐरणीवर असतानाच अतिरिक्‍त उसाचा प्रश्‍नही जोर धरण्याची शक्‍यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील १० पैकी सहकारी २ व खासगी ३ मिळून ५ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केली. या कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता १८ हजार ७०० टन असताना प्रत्यक्षात हे कारखाने १२ हजार ७०५ टन उसाचीच गाळप करीत आहेत. या कारखान्यांनी २९ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ६६ हजार ९९४ टन उसाचे गाळप केले. ८.५ टक्‍के साखर उताऱ्याने २ लाख २७ हजार २५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. 

जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केली. यामध्ये ३ सहकारी व २ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी ३ लाख ७ हजार ७९१ टन उसाचे गाळप करत ८.५७ टक्‍के साखर उताऱ्याने २ लाख ६३ हजार ७१० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता १४ हजार टन आहे. प्रत्यक्षात ते १४ हजार ४७ टन उसाचे गाळप करीत आहेत. 

बीड जिल्ह्यातील १० पैकी ३ सहकारी व २ खासगी मिळून ५ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपात सहभाग नोंदविला आहे. या पाचही कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता ३२ हजार ६५० टन आहे. प्रत्यक्षात हे कारखाने केवळ २१ हजार ६८ टन उसाचे गाळप करू शकत आहेत. या कारखान्यांनी ४ लाख १७ हजार २६२ टन उसाचे गाळप करत ७.८१ टक्‍के साखर उताऱ्याने ३ लाख २५ हजार ८६० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले, अशी माहिती साखर विभागाच्या  सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com