पाटलांनी कोंबड्या विकल्या अन बिर्याणीही! 

कराडजवळच्या राजमाची गावातील युवा कृषी पदवीधर प्रवीण पाटील आणि त्यांची पत्नी सारिका यांनी हे सिध्द करून दाखवले आहे.
chiceken sold.
chiceken sold.

पुणे ः कोणत्याही कामाची लाज न बाळगता आणि हातपाय न गाळता पर्यायांचा शोध घ्यायचा ठरवला तर संकटातही एरवीपेक्षा अधिक नफा कमावता येतो. कराडजवळच्या राजमाची गावातील युवा कृषी पदवीधर प्रवीण पाटील आणि त्यांची पत्नी सारिका यांनी हे सिध्द करून दाखवले आहे. कोरोना साथीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये डगमगून न जाता आपल्या फार्मवरील गावरान चिकन स्वतः कापून त्यांनी विकलेच, पण त्याचबरोबर बिर्याणीसारखे पदार्थ तयार करून त्यांचीही मजबूत घरपोच विक्री करीत तब्बल ६८ हजार रूपयांचा नफा महिनाभरात कमावला. शिवाय नुकसान टळल्यामुळे झालेला फायदा वेगळाच! 

प्रवीण यांनी एमएस.सी.(कृषी) पदवीधर झाल्यावर नोकरीची अपेक्षा न करता शेतीमध्ये लक्ष दिले. चार वर्षांपूर्वी राजमाची (ता. कराड, जि. सातारा) येथे तीन एकर क्षेत्रावर पारंपरिक शेती न करता ‘सांजसावली ॲग्रीकल्चर ॲन्ड पोल्ट्री टुरिझम' सुरू केले. कराड शहर नऊ किलोमीटरवर असल्याने शहरी मंडळी पर्यटन केंद्रावर येऊ लागली. यामध्ये चांगले बस्तान बसले, पण गेल्या दोन महिन्यांत कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे कृषी पर्यटन आणि गावरान पोल्ट्रीचे गणित कोलमडले. कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च वाढला, दुसऱ्या बाजूला चिकन सेंटर आणि ग्राहकही तुटला. या हतबल परिस्थितीत संधी शोधली आणि गेल्या २५ दिवसांत गोवारे गाव आणि कराड शहरातील ग्राहकांना फ्रेश चिकन आणि विविध पदार्थांची विक्री करून नेहमीपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले.  सांजसावली कृषी पर्यटन केंद्रात शेतीच्याबरोबरीने गिरीराजा, ब्लॅक ॲस्ट्रोलॉप, ब्लॅक रॉक या सुधारित गावरान कोंबड्यांची पोल्ट्री, १० गुंठे पॉलिहाऊस, सहा दुधाळ जनावरे, पाच शेळ्या आहेत. प्रवीण शेती आणि पूरक उद्योग आणि सारिका पर्यटकांसाठी जेवणाचे नियोजन पाहते. कराड शहरातील ग्राहकांना कोंबडी, अंडी त्याचबरोबरीने गावरान तंदूर, गावरान ६५, बिर्याणी, अळूवडी असे खाद्यपदार्थ पुरविले जातात. २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाले आणि कृषी पर्यटन, पोल्ट्रीचे गणितच बिघडले. शहरी ग्राहक थांबला, तसेच शेडमधील ४५२ गावरान कोंबड्यांचे करायचे काय, हा प्रश्न होता. कुटुंबाचा आर्थिक गाडा यावरच अवलंबून असल्याने हातपाय गाळून उपयोग नव्हता. कारण एका बाजूला कोंबडीची मातीमोल दराने विक्री आणि दुसऱ्या बाजूला दररोज खाद्य आणि व्यवस्थापन खर्च ठरलेला. 

घरपोच चिकनची विक्री ः  २३ मार्चला प्रवीण आणि सारिकाने ठरविले की, स्वतःच थेट ग्राहकांना ताजे चिकन आणि चिकनचे खाद्यपदार्थ विकायचे. कराड शहरातील नेहमीच्या ग्राहकांशी संपर्क साधला. गावरान कोंबडीच्या चिकनला मागणी होती. प्रश्न होता कोंबडी कापायची कुणी? कारण ओळखीचे चिकन सेंटर बंद आणि मजूर सुट्टीवर. मग प्रवीणनेच हाती सुरी घेतली आणि घरपोच फ्रेश चिकन विक्रीला सुरवात केली. या अनुभवाबाबत प्रवीण म्हणाला की, मी स्वतः कोंबड्या कापून कराड शहरात थेट घरपोच चिकन विक्रीला सुरू केली. काही जणांनी चेष्टा सुरू केली. लोक म्हणायचे, पाटलांनी कधी कोंबड्या कापायला सुरवात केली? लॉकडाऊनच्या काळात तुमचे चिकन खपेल काय? असे प्रश्न येत होते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. कारण नव्या व्यवसायाची संधी दिसली होती. मी ग्रामपंचायत आणि पोलिस विभागाकडून थेट घरपोच चिकन आणि प्रक्रिया पदार्थ पुरवठा करण्यासाठी पास काढला. पर्यटन केंद्राच्या परिसरातील लोक कोंबड्या विकत घ्यायचे. याचबरोबरीने गोवारे गाव आणि कराड शहरातील ग्राहकांच्याकडून मला दररोज १० ते १५ किलो चिकनची मागणी सुरू झाली. रोज सकाळी लवकर कोंबडी कटींग करून चिकन ग्राहकांच्या मागणीनुसार पॅकिंग करतो. या दरम्यान सारिका गावरान तंदूर, गावरान ६५, बिर्याणी बनविते. त्यानंतर मी मागणीनुसार चिकन आणि खाद्यपदार्थ घरपोच करतो. 

कष्टाने दिली आर्थिक साथ  उत्पन्नाबाबत प्रवीण म्हणाला की, ग्राहक चिकन खरेदी करेल काय, याबाबतच शंका होती. परंतु जातिवंत गावरान जिवंत कोंबडी तसेच चिकनला मागणी टिकून होती. मी गेल्या २५ दिवसांत थेट ग्राहकांना दीड किलोची गावरान जिवंत कोंबडी २५० ते ३०० रूपये आणि घरपोच ताजे चिकन ४४० रूपये किलो या दराने विकत आहे. या दिवसांचा हिशेब सांगायचा झाला तर १६८ कोंबडी विक्रीतून ४५,९०० रूपये, २८४ कोंबड्यांच्या चिकन आणि चिकन खाद्यपदार्थ कविक्रीतून ८१,३३० रूपये असे एकूण १,२७,२३० रूपये मिळविले. या कोंबड्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च ५८,७६० रूपये आला. हा खर्च वजा जाता मला ६८,४७० रूपये निव्वळ नफा झाला. विशेष सांगायचे म्हणजे मी स्वतः कोंबडी कापल्यामुळे ११,३६० रूपये कटींगचा खर्च वाचला. ग्राहक नाही म्हणून तशाच कोंबड्या ठेवल्या असत्या तर खाद्य आणि व्यवस्थापनावर १२,६५६ रूपये खर्च झाला असता, तो देखील वाचला. हा वाचलेला खर्च म्हणजेच २४,०१६ रूपये नफाच झाला.  प्रवीण सांगतो...आम्ही दोघे गेल्या पाच वर्षात बिकट परिस्थितीशी लढलो. उमेद कायम ठेवल्याने कष्टाचे फळ मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात थेट कोंबड्या आणि चिकन विक्रीमुळे नेहमीच्या ग्राहकांच्या व्यतिरिक्त ७२ नवीन ग्राहकांशी जोडले गेलो. आता मी २४०० पिल्ले विकत घेतली आहेत. संकटातही नवी संधी दडलेली आहे, ती शोधा, उत्तर तुम्हाला मिळतेच.  संपर्क ः प्रविण पाटील - ९४०३९७०७४५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com