पाणी योजनांचे आठ महिन्यांचे वीजबिल शासन भरणार
पाणी योजनांचे आठ महिन्यांचे वीजबिल शासन भरणार

पाणी योजनांचे आठ महिन्यांचे वीजबिल शासन भरणार

जळगाव : राज्यात उद्भवलेली दुष्काळाची परिस्थिती ही आपल्या कुटुंबातील संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी नागरिकांना पिण्याचे पाणी, चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम देता येईल, यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून आवश्यक त्या उपाययोजना करव्यात. दुष्काळी कालावधीतील पाणीपुरवठा योजनांचे आठ महिन्यांचे वीजबिल शासन भरेल, अशी माहिती महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.१) दिली.

जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात दुपारी टंचाई आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे ७५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. राज्यातील ८७ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यांना मदत मिळणार आहे. वीजपुरवठ्याअभावी बंद असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या थकीत बिलाच्या ५ टक्के रक्कम राज्य शासनाचा मदत व पुनर्वसन विभाग भरेल. वीज वितरण कंपनीने वीज बिलाअभावी पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा वीजपुरवठा खंडीत करू नयेत.``

‘‘बोदवड तालुक्यातील ८० गावे व आडगावसह १६ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. या गावांचे पिण्याच्या पाण्याचे संकट टळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ तालुक्यांतील ३९ गावांत २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तात्पुरत्या ६१ नळयोजना, ५६९ विंधन विहिरींचे प्रस्ताव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे प्रस्ताव तातडीने पाठवा, पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजनांची कामे सुरू आहे ती तातडीने पूर्ण करा. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात १३०६ कामे सुरू असून त्यावर ६७६४ मजूर काम करीत आहेत. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दररोज किमान ३ गावांना भेटी देऊन टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तत्पूर्वी पाटील व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत सकाळी नावीपेठ भागात राज्य सहकारी बँकेच्या जळगाव शाखेचे उदघाटन झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com