नगरमधील छावणीचालकांच्या खात्यांवर जमा होणार ३३ टक्के रक्कम

चारा, पशुखाद्य व पाणीपुरवठा करण्यास छावणीचालकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी चालकांच्या एकूण बिलांपैकी ३३ टक्के रक्कम थेट खात्यांवर जमा करण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम बिलांच्या तपासणीनंतर दिली जाणार आहे. - प्रशांत पाटील ,निवासी उपजिल्हाधिकारी.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : पशुधनासाठी सुविधा पुरविताना छावणीचालकांचा होणारा दैनंदिन खर्च मोठा आहे. अनुदानाची रक्कम वेळेत मिळाल्यास छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडणार नाही. पशुधनाला योग्य सुविधा मिळतील, यासाठी २७ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीतील अनुदानासाठी ४६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीपैकी ३३ टक्के रक्कम थेट छावणीचालकांच्या खात्यांवर जमा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उर्वरित रक्कम बिलाची तपासणी झाल्यानंतर देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे सावट आहे. पशुधन वाचविण्यासाठी २५ जानेवारीला चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. परिपूर्ण प्रस्तावांची पडताळणी करीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ५०३ छावण्यांना मंजुरी दिली. त्यांपैकी ४९१ छावण्या प्रत्यक्षात सुरू आहेत. त्यात लहान-मोठ्या पशुधनाची संख्या तीन लाख आहे. राज्य सरकारने सुरवातीस लहान जनावरांसाठी प्रतिदिवस ३५ रुपये, तर मोठ्या जनावरांसाठी ७० रुपये अनुदान देय असल्याचे नमूद केले.

त्यानंतर एक एप्रिलपासून लहान जनावरांसाठी ४५ व मोठ्या जनावरांसाठी ९० रुपयांचे अनुदान देय असणारा आदेश लागू केला. चाराछावणीच्या अनुदानापोटी सरकारकडून २७ फेब्रुवारी ते १५ एप्रिलदरम्यानच्या कालावधीसाठी जिल्हा प्रशासनास विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे ४६ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ३३ टक्के निधी दिल्यानंतर उर्वरित निधी लेखापरीक्षकांकडून बिले तपासून देण्यात येणार आहे. छावण्या सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झालेला आहे. छावणीचालकांकडून सातत्याने अनुदानाची मागणी पुढे येत होती. करारनाम्यानुसार छावणीचालक संस्थांनी ३० लाख रुपये एवढ्या रकमेची हमी दिलेली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com