वेतनप्रश्नी कामगारांनी अडविले साखर, मळीचे ट्रक

वेतनप्रश्नी कामगारांनी अडविले साखर, मळीचे ट्रक
वेतनप्रश्नी कामगारांनी अडविले साखर, मळीचे ट्रक

नाशिक  : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना थकीत वेतन देण्यास टाळाटाळ होत असल्याने गुरुवारी (ता. ६) कामगारांसह त्यांच्या कुटुंबांतील महिलांनी कारखाना कार्यस्थळावरून विक्री झालेल्या साखरेची व मळीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना कारखान्यावरच अडवून आंदोलन छेडले. या वेळी कार्यस्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदरची घटना तहसीलदार व पोलिसांना कळताच त्यांनी कारखाना कार्यस्थळावर धाव घेत कामगार व धाराशिव साखर कारखान्याच्या अध्यक्ष यांच्यात मध्यस्ती करत पुढील अनर्थ टळला.  याबाबत सविस्तर घटना अशी की, चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वसाका कार्यस्थळावरील गाळप झालेली साखर व मळीच्या विक्रीची प्रक्रिया मागील महिन्यापासून तहसीलदारांच्या माध्यमातून चालू आहे. मागील महिन्याच्या ७ तारखेपासून जवळपास ६० हजार पोती साखर विक्रीतून १८ कोटी रुपये व मळी विक्रीतून २ कोटी रुपये विक्री करूनही ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात उसाचे पेमेंट जमा होत नसल्याने शेतकऱ्यांतही असंतोष दिसून आला. आणि त्यातच कामगारांना २०१७-१८ या मागील गळीत हंगामातील चार महिन्यांच्या वेतनासह चालू २०१८-१९ या गळीत हंगामातील २२ दिवसांचे थकीत वेतन देण्यास वसाका चालविण्यास घेतलेल्या धाराशिव साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने हेतुपुरस्कार टाळाटाळ केली आहे. याबाबत कामगारांनी याअगोदरही साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी थकीत वेतनाबाबत लेखी निवेदने व विनंती केली. मात्र, कुणीही कामगारांना न्याय न दिल्याने विक्री झालेली साखर व मळी घेऊन जाणाऱ्या वाहनांचा ताफा संतप्त कामगारांनी कार्यस्थळावरील गेट बंद करून रोखून धरल्याने वसाका कार्यस्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.  याची माहिती कळताच तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, देवळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, मंडळ अधिकारी श्री. परदेशी यांनी वसाका कार्यस्थळावर धाव घेतली व कामगारांशी चर्चा केली, तसेच धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याशी तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी भ्रमणध्वनीवरून कामगारांच्या थकीत वेतनाच्या मागणीबाबत चर्चा केली. यात अध्यक्ष अभिजित पाटील यांनी येत्या चार दिवसांत कामगारांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेऊन रोखून धरलेल्या वाहनांना साखर व मळी घेऊन जाण्यास सहमती दिली. तसेच संपूर्ण साखर विक्री झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट केले, जाईल असेही या वेळी सांगण्यात आले. या वेळी वसाका कार्यस्थळावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, सरचिणीस रवी सावकार, विजय पाटील, कामगार नेते कुबेर जाधव, शांताराम आहेर, त्रंबक पवार, रवींद्र सोनवणे, नंदकुमार जाधव, व्यंकट पवार, विश्वनाथ देवरे, विलास सोनवणे, सजन रौंदळ, प्रताप देवरे, बाळू पवार, रामा पवार, शेतकरी प्रतिनिधी विनोद आहेर आदींसह कामगार व महिला मोठ्या संख्येने हजर होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com