राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान 

राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) काही अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मतदान करूनच शेतावर जाणे पसंत केले.
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान  Peaceful voting for Gram Panchayats across the state
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान  Peaceful voting for Gram Panchayats across the state

पुणे : राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) काही अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या. मात्र काही वेळानंतर पुन्हा मतदान सुरू झाले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मतदान करूनच शेतावर जाणे पसंत केले. विदर्भात गारठा वाढला होता. परिणामी दुपारपर्यंत मतदान संथगतीने सुरू होते. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ७० टक्के मतदान झाले. राज्यात सरासरी सुमारे ६० टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान हाणामाऱ्या किंवा हिंसक घटना घडल्या नसल्याची माहिती ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळविले आहे. आता सोमवारी (ता.१८) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान झाले. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नक्षलप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मतदारांचा ग्रामपंचायत निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवास मिळाला. सायंकाळपर्यंत ७० टक्के मतदानाची नोंद येथे झाली. गडचिरोलीतील बारा तालुक्यांपैकी पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये मतदान घेण्यात आले. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कुरखेडा, धानोरा या सहा तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी दीड वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले होते. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये २० जानेवारी रोजी मतदान होणार आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील अर्जुना येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया प्रभावित झाली होती. त्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले. महागाव तालुक्यातील सवना येथे उमेदवाराला दारू वाटप करताना पकडण्यात आले. या प्रकरणी महागाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाडेगाव येथे पोलिसांनी मतदारांना वाटण्यासाठी असलेला दारूसाठा जप्त केला. या घटना अपवाद वगळता यवतमाळ जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. भंडारा जिल्ह्यात ७९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. वऱ्हाडातील ८९३ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सर्वाधिक ५२७ ग्रामपंचायतींसाठी बुलडाण्यात मतदान झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी ४० टक्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. दुपारी मतदान करण्यासाठी एकच गर्दी झाली होती.  सांगलीत जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी ठरवण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान अतिशय चुरशीने झाले. महाविकास आघाडी विरोधात भाजप समर्थकांमध्ये लढत झाली. काही गावात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार झाले. परगावच्या मतदारांसाठी विशेष मोहीमच उमेदवारांनी राबवली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या ४९४ जागांसाठी शुक्रवारी (ता.१५) सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाले आहे. एका ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचा प्रकार घडला. कोल्हापुरात सकाळपासूनच मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे.  नगरमध्ये चार वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी मतदानाचा हक्क बजाविला. सातारा जिल्ह्यातील दुपारपर्यंत ५४.१० टक्के मतदान झाले होते. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या. त्यामुळे अनेक गावांत मतदान चुरशीचे झाले. या निवणुकीत उमेदवारांकडून सोशल मिडियाद्वारे प्रचारावर भर देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील दुपारी चार पर्यत सुमारे ५० टक्के मतदान झाल्याचे विविध ठिकाणांच्या बातमीदारांनी कळविले. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. कुसेगाव (ता.दौंड) येथे एक उमेदवार मतदान केंद्राबाहेर मतदाराला चिन्ह सांगत असल्याच्या संशयावरुन दोन्ही गटाच्या काही र्यकर्त्यांमध्ये किरकोळ धक्काबुक्की बाचाबाचीचा प्रकार घडला. दिवसभर तणावपुर्ण शांतता होती. परिंचे येथील गजानन रखमाजी गुरव (वय १०३) यांनी मतदानाचा अधिकार बजावला. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९२० ग्रामपंचायतींसाठी सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान सुमारे ६५ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात ५६६ पैकी ६८ ग्रामपंयातींची निवडणूक बिनविरोध झाली होती. औरंगाबाद, लातूर, बीड, जालना आदी जिल्ह्यांतही चुरशीने मतदान झाल्याने मतदानाचा टक्का वाढला. 

असे झाले मतदान 

  • राज्यात सर्वत्र शांततेत मतदान 
  • यवतमाळ, सिंधुदुर्गमध्ये ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी 
  • नक्षलग्रस्त गडचिरोलीत सुमारे ७० टक्के मतदान 
  • सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी 
  • मतदारांना केंद्रापर्यंत वाहनाची सोय 
  • कार्यकर्त्यांची मतदारांना आणण्यासाठी पळापळ 
  • काही गावात किरकोळ वादावादीचे प्रकार 
  • मतदार आणण्यासाठी पळापळ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com