थकीत खत अनुदान ३३ हजार कोटींवर

थकीत खत अनुदान ३३ हजार कोटींवर
थकीत खत अनुदान ३३ हजार कोटींवर

खत उत्पादन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फर्टिलायजर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय)ने केंद्र सरकारकडून खत अनुदानाची रक्कम चुकती करण्यात उशीर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या थकीत खत अनुदानाची रक्कम ३३ हजार ६९१ कोटी रुपये असून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ती ६० हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने तातडीने ही थकीत अनुदानाची रक्कम खत उत्पादक कंपन्यांना अदा करावी, अशी मागणी ‘एफएआय’चे महासंचालक सतिश चंदर यांनी केली आहे. हे अनुदान थकल्यामुळे कंपन्यांकडील रोख तरलता कमी झाल्याने अडचणीची स्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार युरियाची कमाल विक्री किंमत (एमआरपी) निश्चित करते आणि खत उत्पादकाला एमआरपी आणि प्रत्यक्षातील उत्पादनखर्च यातील फरकाची रक्कम अदा करते. तर बिगर युरिया खतांच्या बाबतीत केंद्र सरकार पोषणद्रव्य आधारित अनुदान देते. २५ खत उत्पादक कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत खत अनुदानाची थकीत रक्कम ३३ हजार ६९१ कोटी रुपये इतकी आहे. यातील २० हजार ८५३ कोटी रुपयांची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) मधील आहे, तर उर्वरित १२ हजार ८३८ कोटी रुपये डीबीटी व्यतिरिक्त इतर योजनेतील आहे. केंद्रीय खते व रसायने मंत्रालयाने पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अतिरिक्त निधीची व्यवस्था केली नाही तर मार्च पर्यंत थकीत अनुदानाची रक्कम ६० हजार कोटी रुपयांवर जाईल, असे चंदर यांनी सांगितले. केंद्र सरकारने खत अनुदानासाठी सुमारे ८० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील सुमारे ५६ हजार कोटी रुपये युरियासाठी तर उर्वरित २६ हजार कोटी रुपये पोषणद्रव्य आधारित अनुदानासाठी मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या अनेक वर्षांपासून खत उत्पादक कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना खत अनुदान देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. परंतु, सरकारकडून खत अनुदान चुकते करण्यात विलंब होत असल्यामुळेच थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा प्रस्ताव स्वीकारला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com