देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी

येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागासाठी जीवनदायी असलेला आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या देवना साठवण तलावाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या योजनेस शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
The pending issue of Devna storage lake is finally resolved
The pending issue of Devna storage lake is finally resolved

नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागासाठी जीवनदायी असलेला आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या देवना साठवण तलावाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या योजनेस शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  

देवनाचा साठवण तलावाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित योजनेस मंगळवारी (ता. १९) मृद्‌ व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे येवल्यातील उत्तरपूर्व भागातील पाणी प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

येवला तालुक्यातील खरवंडी व देवदरी या गावाजवळील मन्याड नदीच्या दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर देवनाचा साठवण बंधाऱ्याचे काम प्रस्तावित आहे. तापी खोऱ्याच्या बृहत आराखड्यात हा प्रकल्प भविष्यकालीन प्रकल्प म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी नियोजन व जलविज्ञान कार्यालय, नाशिकचे मुख्य अभियंता यांचे २० जानेवारी २०१४च्या पत्रानुसार १.८५ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे. प्रस्तावित धरण संरेखेपासून १८ चौ.किमी पाणलोट क्षेत्र आहे. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांच्याकडून योजनेच्या मातीधरणाचे काटछेदाचे संकल्पन करण्यात आलेले आहे. तसेच एसएलटीएसी कडून या प्रस्तावित प्रकल्पाची छाननी झालेली असून या प्रकल्पासाठी रक्कम १२.७७ कोटी खर्च अपेक्षित आहे.

असा होणार फायदा येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ही योजना आहे. तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खु.या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे.

या भागात जानेवारी उजाडले की पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर वाढते. शेती अडचणीत असल्याने अनेकांनी गाव सोडले आहे. ही मान्यता मिळाल्याने आता मोठा दिलासा मिळाला आहे. या भागात शेतीसह पूरक उद्योगांना चालना मिळेल. - भागवतराव सोनवणे, अध्यक्ष-देवनाचा प्रकल्प कृती समिती.

असा आहे देवनाचा प्रकल्प

  • जमिनीचे संपादनक्षेत्र - ५७ हेक्टर (वैजापूर तालुक्यातील १३ हेक्टर व येवला तालुक्यातील ४४ हेक्टर; त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र तर १.२५ हेक्टर क्षेत्र खासगी)
  • मातीच्या धरणाची लांबी - २२५ मीटर  
  • धरणाची उंची -१६.१८ मीटर
  • सांडव्याची लांबी - ९० मीटर
  • परिसरात पाणी उपलब्ध - २.८ दशलक्ष घनमीटर  
  • साठवण तलावात पाणी साठवणूक - १.८५  दशलक्ष घनमीटर
  • प्रकल्पाची सिंचन क्षमता - ३५८ हेक्टर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com