सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी झुंबड

मंगळवारी (ता.24) सोलापुरात संचारबंदी असूनही ग्राहकांनी मात्र खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने संचारबंदीची ऐशीतैशी झाल्याचे जाणवले.
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी झुंबड
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी झुंबड

सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण अत्यावश्यक सेवेमुळे भाजीपाला खरेदी-विक्रीला सूट देण्यात आली आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीत येण्याचे टाळत वाहनाद्वारे थेट व्यापाऱ्यांकडे परस्पर भाजीपाला विक्रीसाठी पाठवला. पण मंगळवारी (ता.24) सोलापुरात संचारबंदी असूनही ग्राहकांनी मात्र खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने संचारबंदीची ऐशीतैशी झाल्याचे जाणवले.  कोरोनाच्या संकटाचे ढग आणखीनच गडद होत आहेत. राज्याच्या विविध भागातून रोज नवी माहिती आणि आकडे समोर येत आहे. त्यामुळे गांभीर्य बाळगले जावे, अशी अपेक्षा असताना लोक सरसकट बाहेर पडत असल्याचे चित्र अन्य जिल्ह्यांप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही आहे. पण पोलिसांनी मंगळवारी अनेक भागात, प्रमुख चौकात, नाक्यावर कडक कारवाई करत उत्साही लोकांना आवरले. त्यामुळे सकाळी बेशिस्त असणारे चित्र दुपारी काहीसे शिस्तीत दिसले. दरम्यान, पुणे, मुंबईत भाजीपाला बाजार बंदची स्थिती असताना, सोलापुरात बाजार समितीने व्यवहार सुरू ठेवले. त्यामुळे पहाटेपासूनच आवारात भाजीपाल्याच्या वाहनांची आवक सुरू होती. पण त्यात शेतकऱ्यांची संख्या अगदीच मोजकी होती. त्या तुलनेत ग्राहकांची, खरेदीदारांची झुंबड सर्वाधिक होती. त्यामुळे संचारबंदी असूनही रोजच्या व्यवहारासारखी परिस्थिती बाजारात पाहायला मिळाली. बाजार समितीच्या आवारातील सर्वच चौक ओव्हरफ्लो झाले होते. सकाळी सहा वाजलेपासून अकरा वाजेपर्यंत आवारातील सर्वच सेलहॅाल गर्दीने ओसंडून वाहत होते. पोलिसही त्यांना आवरू शकत नव्हते. त्यामुळे संचारबंदीची ऐशीतैशी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.  किरकोळ बाजारात तेजी बाजारात मंगळवारी विशेषतः कोथिंबीर, मेथी या भाज्यासह हिरवी मिरची, वांगी, टोमॅटो, बटाटा, फ्लॅावर, कोबी, या फळभाज्यांना सर्वाधिक उठाव राहिला. रोजच्या किंमतीपेक्षाही आज 15 ते 20 टक्क्यांनी त्यांचे दरही वाढले. पण बाहेर किरकोळ बाजारात मात्र हेच दर दीडपट ते दुपटीने लावले जात होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com