कापूस बियाणे विक्री एक जूनपासून 

राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्या १० मेपासून वितरकांना पुरवठा करतील.
PNE20Q95523_org.jpg
PNE20Q95523_org.jpg

पुणे ः राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्या १० मेपासून वितरकांना पुरवठा करतील. मात्र बोंड अळीचा धोका विचारात घेता शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रत्यक्ष विक्री एक जूनपासून सुरू होईल.  राज्यात गेल्या खरीप हंगामात २१ मेपूर्वी कापूस बियाणे विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी निर्बंध अचानक शिथिल केले व एक मेपासून बियाणे विक्रीला मान्यता दिली होती. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र बियाणे विक्री एक महिना उशिरा चालू होणार आहे.  महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा वितरण विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्‍चितीकरण यांचे विनियमन) कायदा २००९ मधील तरतुदींचा आधार घेत कृषी विभागाने या तारखा निश्‍चित केल्या आहेत. मात्र या तारखांचे उल्लंघन झाल्यास कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेत्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  राज्यात २०१७ मध्ये गुलाबी बोंड अळीची मोठी साथ आली होती. बियाणे लवकर उपलब्ध झाल्यास त्याची लागवड देखील लवकर होते. त्यामुळे पुढे लागवडीचे वेळापत्रक थेट बोंड अळीच्या जीवनचक्राला पोषक ठरते. त्यामुळेच २०१८, २०१९ आणि २०२० या तीनही हंगामांत राज्यात अभियान हाती घेण्यात आले होते. यंदा देखील बोंड अळीसाठी प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.  कंपन्यांकडून १० मेपासून वितरकांना पुरवठा  कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या १० मेपासून वितरकांना पुरवठा करण्यास सुरुवात करतील. वितरकांना १५मे पूर्वी कोणत्याही किरकोळ विक्रेत्याला या बियाण्यांचा पुरवठा करता येणार नाही. तसेच, पूर्वहंगामी कपाशी लागवड टाळण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना एक जूनपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे विकता येणार नाही, असे आदेश कृषी विभागाने जारी केले आहेत.  प्रतिक्रिया राज्यात कपाशीचे बियाणे मुबलक आहे. मात्र गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्यामुळेच बियाणे विक्री एक जूनपूर्वी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  - दिलीप झेंडे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com