विनाअट नवीन उद्योगांना परवानगी; भूमीपुत्रांनाही संधी : मुख्यमंत्री ठाकरे

राज्यात नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी राज्य सरकारने 40 हजार एकर जमीन राखीव ठेवली असून ही जमीन भाडेतत्वावर उपलब्ध असेल.
Uddhav
Uddhav

मुंबई: राज्यात नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी राज्य सरकारने 40 हजार एकर जमीन राखीव ठेवली असून ही जमीन भाडेतत्वावर उपलब्ध असेल. तसेच अटी आणि शर्थीच्या जंजाळातून नवीन उद्योगांना सूट देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्योगांना आमंत्रण दिले. राज्यात चौथ्या लॉकडाऊनची माहिती देताना ठाकरे यांनी भूमिपुत्रांना नोकरीची संधी असून ती मिळविण्याची संधी चुकवू नका, असे आवाहन ही केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन 4 च्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. “राज्यात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. परप्रांतिय मजूर गावी गेले आहेत, जर मजुरांचा तुटवडा जाणवत असेल तर महाराष्ट्राला आत्मनिर्भर करण्यासाठी भूमिपुत्रांनी समोर यावे, असे आवाहन केले.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाचे हे संकट पावसाळ्यापूर्वी संपवायचे आहे, असा निर्धारही बोलून दाखवला. मात्र त्याचवेळी त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला गावाकडे न जाण्याची कळकळीची विनंती केली.  मुख्यमंत्री म्हणाले की, परराज्यातील मजुरांना त्या त्या राज्यात सुरक्षित पाठवत आहोत, पण महाराष्ट्रातील कामगार, मजूरही आपल्याला कधी पाठवणार अशी विचारणा करत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवले आम्हाला कधी पाठवणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यावर ठाकरे म्हणाले की, तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही गावाकडे सुरक्षित पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. गावी जाण्याची नितांत गरज आहे का? जर तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुंबई-पुण्यातून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्यांमुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कारण हे नागरिक गावी गेल्यानंतर तिथे त्यांची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिकांनाही त्याचा त्रास होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीडसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना, विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना जिथे आहे तिथेच राहण्याचा, मुंबई-पुणे न सोडण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

  • घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका हे आपल्याला पुढील काही महिने पाळावे लागेल
  • परदेशातूनही लोक आपण आणत आहोत, मात्र विलगीकरण हे आवश्यक आहे, तुम्हाला काही लक्षण नसली तरी तुम्ही वाहक होऊ नका
  • मजूरांकडून तिकीट घेतलेले नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च केला आहे. मुंबईत राहणारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील लोकांनाही घरी पाठवणार, पण अस्वस्थ होऊ नका
  • मी जर समजा हा लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखे महाराष्ट्राचे होईल
  •  मी महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होईन, मात्र मला जे योग्य वाटेल ते ते मी करणार
  • लॉकडाऊन जर उठवला तर इटली, ब्राझीलमध्ये जे काही होतंय ते इथे होईल, त्यामुळे लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊदे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन, रेड झोनमध्ये तूर्तास सूट नाही
  • रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स इतर आरोग्य सोयी सुविधा वाढवत आहे
  • मुंबईत 19 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आहे, त्यातील 5 हजार रुग्ण बरे झाले आहेत, दुर्देवाने काहींचा मृत्यू झाला. याचा अर्थ वेळेत आलात तर बरे होता येते.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com