‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ घटकांना मिळणार पूर्वसंमती

कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत (पोकरा) वैयक्तिक लाभाच्या घटकांना पूर्वसंमती स्थगित करण्यात आली होती.
POCRA
POCRA

नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत (पोकरा) वैयक्तिक लाभाच्या घटकांना पूर्वसंमती स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर शेतीशाळा आणि बीजोत्पादन या घटकांना पूर्वसंमती देण्यात आली. यानंतर कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीतील निर्देशानुसार वैयक्तिक लाभा घटकांच्या पूर्वसंमतीची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी पत्राव्दारे सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. १४) दिले आहेत.  ‘पोकरा’ची अंमलबजावणी राज्यातील १५ जिल्ह्यांमधील पाच हजार १४२ गावांत सहा वर्षांच्या कालावधीत (२०१८-१९ ते २०२३-२४ पर्यंत) राबविण्यात येत आहे. प्रकल्पाचे सर्वांगीण उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने प्रकल्पातील सर्व घटक राबविण्यास असलेला वाव विचारात घेऊन सर्व गावसमुहामध्ये प्रकल्प घटकांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान कोवीड - १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांना पूर्वसंमती स्थगित करण्यात आली होती. यानंतर २० ऑगस्टपासून शेतीशाळा आणि बीजोत्पादन या दोन घटकांसाठी पूर्वसंमती देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच जिल्ह्यांच्या प्रकल्प आढावा बैठकीत वैयक्तिक घटकांच्या पूर्वसंमतीची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रकल्प गावातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जावर मार्गदर्शक सूचनांनुसार घटकनिहाय कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी सोमवारी (ता. १४) सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यात २०१९-२० साठीचा शिल्लक लक्षांक आणि २०२०-२१ चा लक्षांक एकत्रित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. वैयक्तिक घटकात यात मात्र शेळीपालन बाब स्थगित असल्याने या बाबीचे अर्ज लाभार्थ्यांनाकडे परत करण्याचे सूचना दिल्या आहेत. या घटकांना मिळणार पूर्वसंमती फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड, गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप कंपोष्ट उत्पादन युनिट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट, वैयक्तिक शेततळे (सर्व प्रकारचे) व शेततळे अस्तरीकरण, खारपाण पट्यातील गावांमध्ये वैयक्तिक शेततळे (सर्व प्रकारचे), विहिरीचे पुनर्भरण, ठिबक व तुषार सिंचन संच, हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन करणे, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट हाऊसमधील भाजीपाला व फुलपिकांचे लागवड साहित्य, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पंपसंच, पाइप व यांत्रिकीकरण, नवीन विहीर घेणे या बाबींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया ‘पोकरा’तंर्गत वैयक्तिक घटकांना मंजुरी बंद केल्यामुळे आम्हाला योजनेचा लाभ मिळत नव्हता. आता लाभ मिळेल, असे कळविल्यामुळे समाधान वाटत आहे. - माधव वडजे, शेतकरी, उंद्री (पदे) ता. मुखेड जि. नांदेड.

वैयक्तिक घटकातंर्गत ज्यांनी अर्ज केले आहेत, अशांना कृषी ग्राम समितीच्या मंजुरीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल. यावेळी काही घटकात लक्षणांकानुसार घटकांना मंजुरी देण्यात येणार आहे. मागील लक्षांक व चालू वर्षाचे लक्षांक यामुळे वैयक्तिक घटकांना लाभ मिळेल. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com