रब्बीसाठी गिरणा धरणातून आवर्तनाची शाश्‍वती

रब्बीसाठी गिरणा धरणातून आवर्तनाची शाश्‍वती
रब्बीसाठी गिरणा धरणातून आवर्तनाची शाश्‍वती

जळगाव ः जलसाठा मुबलक असल्याने जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यातील शेती व गावांमधील पाण्याची गरज पूर्ण करणाऱ्या गिरणा धरणातून आगामी रब्बी हंगामात पाण्याचे आवर्तन मिळण्याची शाश्‍वती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामासंबंधीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गिरणा धरणाचा मोठा आधार शेतकरी, प्रशासनालादेखील होणार आहे.  गिरणा धरणाच्या कालवा समितीची बैठक सप्टेंबरअखेरिस होण्याची शक्‍यता आहे. कालवा समितीच्या बैठकीत धरणाचे पाणीवाटप, गरजा यासंदर्भात चर्चा होईल. यानंतर अंतिम निर्णय होईल. या प्रकल्पात यंदा ७३ टक्‍क्‍यांवर जलसाठा आहे. मागील वर्षी या धरणात ४० टक्के जलसाठा सप्टेंबरअखेर निर्माण झाला होता. जलसाठा कमी असल्याने रब्बीसाठी आवर्तन मिळू शकले नव्हते. फक्त चार वेळेस पिण्याच्या पाण्यासंबंधी नदीत नोव्हेंबर ते मे यादरम्यान आवर्तन सोडण्यात आले होते. या धरणावर मनमाड (जि. नाशिक), चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या शहरांसह अनेक मोठ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याची मदार आहे. तसेच सुमारे १०० पेक्षा अधिक गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण गिरणेच्या पाण्यामुळे होते.  या धरणाच्या माध्यमातून भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्‍यांमधील सुमारे २१ हजार हेक्‍टरवरील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळते. तसेच कालव्यांच्या माध्यमातून या धरणातून पारोळा, एरंडोलातील लघू प्रकल्पांमध्ये पाणी आणता येते. यंदा अर्धाअधिक पावसाळा संपला आहे. सप्टेंबरअखेर पावसाळा अधिकृतपणे संपेल. तोपर्यंत आणखी पाऊस झाल्यास जलसाठा वाढेल. जलसाठा आणखी वाढला तर पश्‍चिम भागातील कोरडवाहू कापूस पिकालादेखील सिंचनासंबंधीचे संरक्षण, व्यवस्था होऊ शकणार आहे. यंदा पावसाची स्थिती बरी असल्याने व गिरणा प्रकल्पात बऱ्यापैकी साठा असल्याने पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com