नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याला फसविणाऱ्यास दिल्लीतून अटक

कांदा
कांदा

नाशिक : लाखलगाव येथील कांदा व्यापाऱ्यास दोन कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्यास दिल्लीतून अटक केली आहे. अली हुसैन मोहंमद हुसेन ( रा. दरियागंज, दिल्ली) असे संशयिताचे नाव असून गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्यास अटक केली आहे. या प्रकरणी गेल्या ऑगस्ट महिन्यात आडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.  मुनाफ अब्दुल रहेमान सौदागर (रा. लाखलगाव, ता.जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते कांद्याचे व्यापारी आहेत. संशयित अली हुसैन याने सईद के. वारसी असे खोटे नाव सांगून, दिल्लीतील के. एस. व्हेजिटेबल ॲण्ड फुड गुडगाव या कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे कांदा व्यापारी मुनाफ सौदागर यांना सांगितले होते. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून कांदा खरेदी केला. सुरवातीला त्याने रोख व्यवहार करीत कांदा व्यापाऱ्याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्याच विश्‍वासाने संशयिताने १९ डिसेंबर २०१८ ते ४ एप्रिल २०१९ यादरम्यान ४२ ट्रक व ३५ कंटेनरमधून २ कोटी ५० लाख ६१ हजार ७७८ रुपयांचा कांदा खरेदी केला. हा कांदा श्री. सौदागर यांनी संशयितावर विश्‍वास ठेवून जैद ओनियन एजन्सी, ओखला मंडी दिल्ली, राज ओनियन एजन्सी, सियालदा पश्‍चिम बंगाल या ठिकाणी पाठविला. त्याबदल्यात संशयिताने फक्त ५० लाख रुपये श्री. सौदागर यांना दिले. उर्वरित दोन कोटी रुपयांची रक्कम संशयिताने दिली नाही. त्यानंतर त्याचा संपर्कही होत नव्हता.   अखेरिस फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गेल्या २६ ऑगस्ट रोजी आडगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आडगाव पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखेच्या युनिट एककडून सुरू असताना, कांदा व्यापाऱ्यास गंडा घालणारा संशयित दिल्लीत असल्याची खबर मिळाली होती. पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार संजय मुळक, संतोष कोरडे, सचिन अजबे यांचे पथक शनिवार (ता.५) दिल्लीकडे रवाना झाले. रविवार (ता. ६) दुपारी सव्वा वाजता संशयित अली हुसैन यास अटक केली. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात हजर करून नाशिकमध्ये आणले आहे. संशयिताच्या चौकशीतून आणखीही व्यापाऱ्यांच्या फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com