नंदुरबार जिल्ह्यात मिरचीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव

विषाणूजन्य रोग अजूनही गेलेला नाही. पंधरा दिवसांत तोडे होत आहेत. पण उत्पादन निम्मेच हाती लागेल, अशी पिकाची स्थिती आहे. निम्मे क्षेत्र तर रोगराईने रिकामे करावे लागेल, अशी स्थिती आहे. - कैलासभाई पाटील, मिरची उत्पादक,बामडोद, जि. नंदुरबार
कोठली (ता. नंदुरबार)  येथे कीड-रोगग्रस्त मिरचीची पाहणी करताना कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ व शेतकरी.
कोठली (ता. नंदुरबार) येथे कीड-रोगग्रस्त मिरचीची पाहणी करताना कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ व शेतकरी.

नंदुरबार ः मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारमध्ये यंदा मिरची उत्पादक लीफ कर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगासह (स्थानिक भाषेत घुबड्या) पांढरी माशी, फुलकिडी या समस्यांनी पुरते हतबल झाले आहेत. यातच मागील वर्षी मिरचीला हवे तसे दर नसल्याने यंदाच्या हंगामातील लागवडही कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे.  नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तालुक्‍यातील समशेरपूर, बामडोद, कोठली, पिंपळोद, खोंडामळी, पळाशी, न्याहली आदी भागात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मागील दोन तीन वर्षात शहादा, तळोदा तालुक्‍यातही हे पीक वाढू लागले. पण मागील वर्षी लाल मिरचीला १५०० ते १८०० रुपयेच दर मिळाले. २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर असले तर ते परवडतात. एवढे दर मिळालेच नाहीत. शिवाय कोल्डस्टोरेजमध्ये मिरचीची मोठी साठवणूक मागील हंगामात झाल्याने पुढे मिरचीला फारसे दर नसतील. यासोबत मागील हंगामात कापसाला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंतचे दर मिळाल्याने अनेक शेतकरी कापसाकडे वळले. दुसऱ्या बाजूला मागील तीन वर्षे मिरचीवर लीफ कर्ल व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव वाढला. कापसाचे क्षेत्र जिल्ह्यात यंदा २० टक्के अधिक आहे. अर्थातच कापसामुळे मिरचीवर फुलकिडी, पांढरी माशीही आढळल्याची माहिती कोळदा (जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.  लागवड निम्म्यावर यंदा मिरचीची लागवड निम्म्यावर आली आहे. शहादा तालुक्‍यातील ब्राह्मणपुरी, पुसनद भागात लागवड आहे. तर नंदुरबारात पिंपळोद, बामडोद, कोठली भागातच अधिक लागवड आहे. मागील हंगामात जवळपास ११०० हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदा फक्त ४०० हेक्‍टरवर लागवड झाल्याची माहिती आहे. यातच यंदा पाऊस कमी असल्याने काही उत्पादक मिरचीचे सिंचनही व्यवस्थित करू शकत नसल्याचे चित्र आहे. उत्पादनही निम्म्यावर येईल, असे चित्र आहे.  फवारण्यांची कटकट मिरचीवरील कीड-रोग अजूनही दूर झालेले नाहीत. फवारण्या दर दहा दिवसाआड घ्याव्या लागत आहेत. त्यात अधिकचा उत्पादन खर्च येत आहे. मार्चपर्यंत मिरचीचे पीक असेल. जूनमध्ये लागवड झाली. आजघडीला तोडे सुरू आहेत. पण खर्च अधिक आल्याने पीक परवडेल की नाही, ही समस्या आहे.  प्रतिक्रिया मिरचीच्या तुलनेत कापसाचे पीक परवडणारे असल्याने अनेक शेतकरी कापसाकडे वळले. पण कापसाच्या पिकासोबत पांढरी माशी, फुलकिडीची समस्या निर्माण झाली. अजूनही शेतकरी दहा दिवसांआड कीडनाशकांची फवारणी करीत आहेत. कीड-रोगामुळे मिरचीची पुरती वाताहत झाली आहे.  - प्रा. आर. एम. पाटील, विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, जि. नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com