द्राक्ष किड
द्राक्ष किड

सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांवर किडीचा प्रादुर्भाव

फवारणी केली तरी रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. मोठी अळी मजुरांकडून गोळा करून बाहेर काढून नष्ट करत आहोत. परंतु, खर्चात वाढ झाली आहे. अळीचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पादन घट होण्याची शक्यता आहे. - अमर भोसले, द्राक्ष उत्पादक, मळणगाव, ता. कवठेमहांकाळ

सांगली ः द्राक्षाची सप्टेंबर छाटणी २० टक्के झाली आहे. सध्या पोंगावस्थेत बागा आहेत. मात्र, द्राक्ष बागेवर स्पोडोप्टेरा लिट्युरा अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळी पोंगा अवस्थेतील कोवळे द्राक्ष घड पोखरून नष्ट करण्यास सुरवात केली आहे. या अळीचा प्रादुर्भाव दहा टक्के बागेवर असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. परिमाणी, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र सव्वा लाख एकर आहे. गेल्या महिन्यात अतिपावसामुळे द्राक्ष वेलींची पाने गळून पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सप्टेंबर छाटणी घेतली. मात्र, दुष्काळी पट्ट्यात पाणी कमतरता असल्याने छाटणी घेतली नाही. सप्टेंबरमधील घेतलेल्या द्राक्ष बागा सध्या पोंगा अवस्थेतील कोवळे द्राक्ष घड लागले आहेत. सप्टेंबर महिन्यातील पाऊस आणि ढगाळ वातावरणाने या अळीसाठी पोषक हवामान मिळाले आहे. ज्या ठिकाणी मका पीक आहे, त्या ठिकाणी या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.  छाटणीनंतर पोंगा अवस्था व फेलफूट काढण्याच्या पूर्वीच्या अवस्थेत एका काडीवर व वेलीवर पाच ते आठ अळी दिसून येत आहेत. कोवळे कोंब खाऊन नुकसान करीत आहेत. दिवसा वेलीवर न दिसणारी अळी रात्रीच्या दरम्यान द्राक्ष वेलीवर आढळून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी फवारणी करावी लागत आहे. मात्र, फवारणी करूनदेखील अळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी वेलीवरील मजुरांकडून अळी गोळा करून नष्ट करावी लागत असल्याचे चित्र आहे. परिमाणी, उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.  कृषी विभागाकडून दुर्लक्ष  सध्या द्राक्ष बागेवर स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके फवारणी करत आहेत. परंतु, कीड आटोक्यात येत नाही. त्यातच कृषी विभागाकडून या किडीबाबत शेतकऱ्यांना माहिती, सल्ला आणि मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com