कलिंगडावर बुरशीजन्य, वेलमर रोगाची लागण 

फेब्रुवारी महिन्यात पडलेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका कलिंगडाला बसला आहे. रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील कलिंगड उत्पादनावर परिणाम झाला आहे.
watermelon
watermelon

रत्नागिरी ः फेब्रुवारी महिन्यात पडलेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका कलिंगडाला बसला आहे. रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील कलिंगड उत्पादनावर परिणाम झाला आहे. कलिंगडाच्या वेलींवर बुरशीजन्य, वेलमर रोगाची लागण झाली असून उत्पादनात घट आली आहे.  भातशेती आटोपली की रब्बी हंगामातील लागवडीला सुरवात होते. भाजीपाल्याबरोबरच कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या कलिंगड लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. ऑक्टोबरनंतर ही लागवड केली जाते. बचत गटांसह अनेक वैयक्तिक शेतकरी याकडे वळलेले आहेत. जिल्ह्यात सरासरी दीडशे हेक्टरहून अधिक लागवड होते. फळधारणेवेळी फेब्रुवारीच्या दरम्यान ढगाळ वातावरण आणि सलग तीन ते चार दिवस पडलेला अवकाळी पाऊस यामुळे प्रतिकूल वातावरण होते. या कालावधीत मळभ व पहाटेचे धुके, उष्मा याचा परिणाम कलिंगडावर झाला. कलिंगडाचे वेल बुंध्यांमध्येच सुकले आणि काही कालावधीत वेल मरू लागले. या परिस्थितीमुळे पहिल्या टप्प्यातील लागवडीवर परिणाम झाला आहे.  रत्नागिरी तालुक्यातील पाली-पाथरटमधील शेतकरी शंकर धाडवे यांनी १ एकरावर लागवड केली होती. तर साठरे बांबरमधील विजय बारगुडे, निलेश ठोंबरे व संदीप ठोंबरे यांनी २ एकर, सुशिल शिंदे यांनी २० गुंठे आणि प्रकाश बावकरांनी १ एकरावर कलिंगड लागवड केली होती. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कलिंगडाच्या फळांचा आकारही कमी झाला आहे. दर्जाही घसरला असून कलिंगडाला बाजारभाव मिळत नाही. गतवर्षीच्या तुलनेत त्यांच्या उत्पादनात सुमारे ६० टक्के घट झाली आहे. दरवर्षी १३ ते १४ टन उत्पादन मिळते; मात्र यंदा फक्त ३ ते ४ टनच उत्पादन मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. 

प्रतिक्रिया शेतामध्ये निर्माण झालेल्या या आजाराची माहिती नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कृषी विभागाने याची दखल घेऊन या वेलमर आजारावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.  - विजय बारगुड, शेतकरी, साठरेबांबर, जि. रत्नागिरी 

कलिंगडाची दोन टप्प्यात लागवड करतो. यातील पहिल्या टप्प्यातील लागवडीला वातावरणाचा फटका बसला आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने करपली होती.दरवर्षी टनभर मिळणारे उत्पादन यंदा ६०० किलोपर्यंत आले आहे. त्यामुळे पाच हजार रुपयांचा नफा घटला आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे फेब्रुवारीनंतर लागवड केलेल्या रोपांना अडचण आलेली नाही.  - संतोष भडवळकर, शेतकरी, राजवाडी, ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com