कीडनाशकांचा पुरवठा ‘कृषी उद्योग’कडून विस्कळित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यातील शेकडो गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांवर कीड-रोगांचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडून कीडनाशकांचा (पेस्टिसाइड्‌स) पुरवठा विस्कळित झालेला आहे. यामुळे कीड-रोग नियंत्रणात अडथळे येत असल्याने कृषी विभाग हैराण झाला आहे.

शेतकऱ्यांना क्विनॉलफॉस, प्रोफेनोफॉस, क्लोरपायरिफॉस, कार्बेन्डाझिम, इंडोक्झाकार्ब, अॅसिटामिप्रिड या कीटकनाशकांचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाकडून ‘कृषी उद्योग’ला पत्र दिले गेले आहे. मात्र सतत घोटाळ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या कृषी उद्योग महामंडळाची शेतकऱ्यांसाठी काम करण्याची वेळ येताच पिछाडीवर जाण्याची असलेली प्रतिमा यंदाही कायम आहे.

राज्यात सध्या ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडी यांसारख्या रसशोषक किडींचा फैलाव झालेला आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना केवळ सल्लाच नव्हे, तर काही प्रमाणात रासायनिक किडनाशकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. मात्र, कृषी विभागाला स्वतः  किडनाशकांची खरेदी न करता ‘कृषी उद्योग’ची मदत घ्यावी लागते. कृषी विभागाला एक लाख दहा हजार लिटर्स  किडनाशकांची तातडीने आवश्यकता असताना ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत ७९ हजार लिटर्स  किडनाशके ‘कृषी उद्योग’ने पुरवली नाहीत.

कपाशीतील बोंड अळीचे संकट आता ७०० गावांच्या पुढे पसरले आहे. एका बाजूला गावांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना अनावश्यकपणे संजीवकांचा वापर करण्यास भाग पाडले जात आहे. पण, दुसऱ्या बाजूला अत्यावश्यक कीडनाशके पुरवण्यात आम्हीदेखील कमी पडत आहोत. त्याला कृषी उद्योग महामंडळ जबाबदार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाला सर्वांत जास्त चिंता बोंड अळीच्या प्रादुर्भावाची आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  किडनाशकांचा भरपूर प्रमाणात पुरवठा झाला, तरच शेतकऱ्यांना वेळेवर वाटप करून त्याची फवारणी होऊ शकते, अन्यथा बोंड अळीचे संकट वाढत जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे प्रोफेनोफॉस हे कीटकनाशक सध्या कृषी विभागाकडून पुरविले जात नसल्याचे दिसून येते.

कृषी विभागाला ३० हजार लिटर प्रोफेनोफॉसची आवश्यकता असताना दहा हजार लिटर इतकाच पुरवठा ‘कृषी उद्योग’ने केला आहे. कापूस व इतर पिकांवरील कीड-रोग नियंत्रणासाठी राज्यात एक लाख लिटरपेक्षा जास्त कीडनाशकांची आवश्यकता होती. त्यानुसार आम्ही कृषी उद्योग विकास महामंडळाला मागणीपत्रदेखील दिले. मात्र, महामंडळाने केवळ ३० हजार लिटरच्या आसपास कीडनाशकांचा पुरवठा केला. प्रॉफेसेनोफॉसबाबत तर पुरवठाच करता येणार नसल्याचे महामंडळाकडून सांगितले गेले आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

कीड व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने यंदा भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. कीड नियंत्रणासाठी आम्हाला १७ कोटी रुपये जादा देण्यात आलेले आहेत. यात बोंड अळी नियंत्रणासाठी आठ कोटी रुपये देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. मात्र, ‘कृषी उद्योग’च्या सुस्त कारभारामुळे निधी आहे, पण  किडनाशके नाहीत अशी अवस्था कृषी विभागाची आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 ‘मागणीप्रमाणेच कीडनाशकांचा पुरवठा’ कीडनाशकांबाबत कृषी विभागाकडून आलेल्या मागणीप्रमाणेच आम्ही पुरवठा करतो आहे. मात्र अचानक मागणी आल्यामुळे काही समस्या तयार झाल्या. तथापि, आम्ही ‘महाराष्ट्र इनसेक्टिसाइड कंपनीच्या संपर्कात असून, मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी महामंडळाकडून काळजी घेतली जात आहे, असे महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com