कीडनाशके विक्रीसाठी पदविकेच्या अटीस मुदतवाढ

कीडनाशके विक्रीसाठी बंधनकारक ठरवलेली पदविका सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
कीडनाशके विक्रीसाठी पदविकेच्या अटीस मुदतवाढ
कीडनाशके विक्रीसाठी पदविकेच्या अटीस मुदतवाढ

पुणे : कीडनाशके विक्रीसाठी बंधनकारक ठरवलेली पदविका सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.  केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहसचिव अतीश चंद्रा यांनी ९ डिसेंबरला अधिसूचना काढली आहे. पदविका प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विक्रेत्यांना दिलेली मुदत आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे. ही मुदत आधीच्या अटीनुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध धरण्यात आली होती.  सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या पदविकेसाठी बारा आठवड्यांचा एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. राज्यात कृषी खात्याच्या कृषी व्यवस्थापन व विस्तार प्रशिक्षण संस्थेने हा अभ्यासक्रम कीडनाशके विक्रेत्यांसाठी खुला केला आहे. मात्र विक्रेत्यांची इच्छा असूनही देशभरातील विक्रेत्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पदविकादेखील न मिळाल्याने पेच तयार झाला होता.  कीडनाशकांची विक्री परवानाधारक व्यक्तीलाच करता येते. विक्री अथवा वितरण, साठवणुकीसाठी संबंधित व्यक्तीकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी, अशी सक्ती केंद्राने केली आहे. कृषिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायन किंवा जीवशास्त्र यापैकी एका एका शाखेची ही पदवी असावी, असा नियम करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्रीय कीडनाशके नियम १९७१ च्या दहाव्या कलमात सुधारणा करण्यात आली होती.  या अटीमुळे वर्षानुवर्षे कीडनाशके विक्री व्यवसाय करणारे विक्रेते अडचणीत आलेले आहेत. त्यांच्याकडे पदवी नाही आणि वयोमर्यादेमुळे अशी पदवी प्राप्त करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे केंद्राने अशा व्यक्तींसाठी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा दुसरा पर्यायदेखील देण्यात आलेला होता.  केंद्राने अशी पदविका देण्यासाठी अभ्यासक्रम चालविण्याची मुभा कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, हैदराबादमधील मॅनेज संस्था, केंद्र शासनाची एनआयडीपीआर संस्थेला दिली आहे. 

प्रतिक्रिया... देशातील तीन लाख निविष्ठा विक्रेत्यांचे लक्ष या समस्येकडे लागून होते. केंद्र सरकारने मुदतवाढ दिल्यामुळे त्याचा फायदा राज्यातील ४० हजार विक्रेत्यांना होईल. कारण पदविका सादर केल्यानंतरच परवान्याचे नूतनीकरण होणार आहे. – मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com