सीताफळ बागांना फळमाशीचा विळखा

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सतत झालेला पाऊस, हवेतील वाढती आर्द्रता यांचा परिणाम सीताफळ बागांवर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे दीड हजार हेक्टरहून अधिक बागा फळमाशीच्या विळख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्केहून अधिक घट येत असून, सीताफळ बागायतदारांचे एकरी सुमारे २०० ते ३०० किलो नुकसान झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याची स्थिती आहे.
Pick up fruit trees in custard apple orchards
Pick up fruit trees in custard apple orchards

पुणे ः सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सतत झालेला पाऊस, हवेतील वाढती आर्द्रता यांचा परिणाम सीताफळ बागांवर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे दीड हजार हेक्टरहून अधिक बागा फळमाशीच्या विळख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्केहून अधिक घट येत असून, सीताफळ बागायतदारांचे एकरी सुमारे २०० ते ३०० किलो नुकसान झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याची स्थिती आहे.

पुणे जिल्ह्यात सीताफळाचे सुमारे ३० ते ३५ गावांमध्ये सुमारे १ हजार ७३७.८४ हेक्टरवर उत्पादन शेतकरी घेतात. पुंरदर तालुक्यातील सोनोरी, दिवे, काळेवाडी, झेंडेवाडी, गुरोळी, सिंगापूर, पिंपळे, वाघापूर, राजेवाडी, माळशिरस, जेजुरी, वाल्हा, परिंचे, पांगारे, बोपगाव, सासवड, वाळूंज, शिवरी, बेलसर, खळद, खानावडी, पारगाव अशा गावांमध्ये फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.

सीताफळांवर पडत असलेल्या फळमाशीमुळे शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत आहे. तरीही फळमाशी आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे फळे काळे पडणे, फळगळ होणे, फळ सडणे, फळांमध्ये अळ्या तयार होणे आदी समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सीताफळ उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  

फळमाशीमुळे सीताफळाचे अतोनात नुकसान होत असून, ग्राहकांपर्यंत चांगल्या प्रतीचा माल पोचवण्यात शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच फळांमध्ये अळ्या निघत असल्याने ग्राहकही ते खरेदी करण्याकडे काणाडोळा करत आहेत. तसेच ढगाळ हवामान व कमी सूर्यप्रकाश यामुळे सीताफळ पिकांच्या झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया घटून फळाच्या आकारात घट झाली आहे. त्यामुळे बाजारभाव कमी मिळत आहे. कमी आकाराच्या फळांना बाजारात अत्यल्प मागणी आहे. मोठ्या आकाराचे फळ तयार होत नसल्याने कमी आकाराची फळे लवकर पिकत आहेत. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

माझ्याकडे एक एकरावर सीताफळ बाग आहे. त्यामध्ये सुमारे २००-२५० झाडे आहेत. फळमाशीमुळे वेळोवेळी फवारण्या चालू होत्या. दरवर्षी एकरी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत सीताफळातून उत्पन्न घेतो. मात्र यंदा फळमाशीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून एकरी सुमारे ५० हजार हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. - नितीन इंगळे, सीताफळ उत्पादक, वाळुंज, ता. पुंरदर  

जास्त पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. फवारणीनंतरही सततच्या पावसामुळे काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे सीताफळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळाचा आकार कमी झाला असून, कमी आकाराच्या फळांना बाजारभावदेखील कमी मिळत आहे. यामुळे उत्पन्नातही घट झाली आहे. - निवृत्ती फाटे, सीताफळ उत्पादक, वडकी, ता. पुरंदर,  

आत्माअंतर्गत फळमाशीच्या नियंत्रणासाठी २७ गावांत एकूण २७० प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात आली आहेत. यामध्ये प्रति शेतकरी दहा कामगंध सापळे असे एकूण १६२० सापळे मोफत देण्यात आले आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड असल्याने किडीचे सार्वजनिकरित्या नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कमी खर्चाचे कामगंध सापळे घरीच तयार करून वापरावे, असे आवाहन केले आहे. - स्मिता वर्पे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, पुरंदर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com