बोंडअळीच्या प्रादुर्भावाने वाढली शेतकऱ्यांची चिंता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती (प्रतिनिधी) ः अमरावती विभागातील अनेक जिल्ह्यांत कपाशीवरील बोंडअळीने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. यवतमाळच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव कमी असला तरी कृषी विभागाकडून याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

अमरावती जिल्ह्यात पाच हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासोबतच अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, पातूर या भागांतदेखील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढता असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बार्शीटाकळी तालुक्‍यात सिंचनाची सुविधा असलेल्या महान परिसरातील अनेक गावांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर नांगर फिरविला.

निंभारा येथील दादाराव नानोटे (पाटील) यांनी टप्प्याटप्प्याने आपली कपाशी काढण्यावर भर दिला. यापूर्वी प्रादुर्भावग्रस्त कपाशीची बोंडे घरच्या बैलाने खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. परंतु जनावरांना कापून ठेवलेली कपाशीची झाडे व त्यावरील बोंड खाण्याचा मोह सुटत नसल्याचेही ते म्हणाले. सुमारे पाच एकरांवर त्यांची कपाशीची लागवड असून, हे संपूर्ण क्षेत्र बोंडअळीने पोखरल्याने उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील शक्‍य नसल्याचे ते सांगतात.

गावातील इतर शेतकऱ्यांच्या शिवारातदेखील बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अकोला जिल्ह्यातदेखील सहा ते सात हजार हेक्‍टर क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त असल्याचा दावा केला जात आहे. गणपत नानोटे, बाळू नानोटे व इतर शेतकऱ्यांनीदेखील बोंडअळीमुळे नुकसान झाल्याचे सांगितले. अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून या संदर्भाने सर्वेक्षण व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com