उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी प्रकल्पांचे नियोजन करा ः जयंत पाटील

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
Plan projects for North Maharashtra, Marathwada: Jayant Patil
Plan projects for North Maharashtra, Marathwada: Jayant Patil

नाशिक : नाशिक व नगर जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामासंबंधी मूलभूत बाबींची चर्चा करण्याच्या हेतूने जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा जाणीवपूर्वक आढावा घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. २२) जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर, जलसंपदा विभागाचे सचिव एन. व्ही. शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, (नगर) अधीक्षक अभियंता आमले, (धुळे) ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे,  नांदूर मध्यमेश्वर कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी श्री. भुजबळ यांनी दिल्या.

श्री. पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबरोबरच शिल्लक कामांसाठी सामित्व मंजूर करणे तसेच नाशिक, नगर जिल्ह्यातील वळण बंधाऱ्यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तातडीने ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिथे शक्य आहे तिथे पाणी वळवण्यासाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. तसेच लहान व लवकर पूर्ण होणारे प्रकल्प तात्काळ पूर्णत्वासाठी नेले जातील त्यासाठी निधीची तरतूदही केली जाईल. मोठ्या प्रकल्पांसाठी प्रसंगी कर्जही काढण्याचे नियोजन केले जाईल. आमदारांच्या मतदार संघातील चाऱ्यांची कामे तसेच कॅनॉलच्या देखभाल व दुरुस्तीची कामे त्यांच्यासोबत बसून चर्चेतून अधिकाऱ्यांनी पूर्ण करावेत. त्यासाठी १० टक्के निधीची तरतूदही करण्यात आली असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे : भुजबळ महाराष्ट्राच्या जमिनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही अथवा लिहून देणार नाही. राज्याच्या हक्काचे पाणी राज्यातच राहायला हवे. आमदारांनी सुचवलेल्या छोट्या प्रकल्पांची कामेही तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी श्री. भुजबळ यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com