जालना जिल्ह्यात २४ शेतीशाळांचे नियोजन

जालना जिल्ह्यात २४ शेतीशाळांचे नियोजन
जालना जिल्ह्यात २४ शेतीशाळांचे नियोजन

जालना : जिह्यामध्ये ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियान पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून  ‘आत्मा’च्या वतीने शेतकऱ्यांना शेतावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात आत्माच्या माध्यमातून प्रतितालुका ३ शेतीशाळा याप्रमाणे एकूण २४ शेतीशाळेचे नियोजन करण्यात आले आहे. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत हिवर्डी येथे आत्माचे प्रकल्प संचालक बी. आर. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळेचे पाहिले सत्र पार पडले. या कार्यक्रमाला आत्माचे दत्तात्रेय सूर्यवंशी, अर्जुन मद्दलवार, कृषी सहायक नारायण राठोड व शेतकरी मित्र रामेश्वर भुतेकर यांची उपस्थिती होती.

पहिल्या सत्रात सोयाबीन पिकांची पेरणी करताना घ्यावयाची काळजी, बियाणे उगवण क्षमता घरच्या घरी कशी तपासावी, बीजप्रक्रिया कशी करावी, रुंद सरी व वरंबा पद्धतीने बीबीएफने पेरणी करणे या विषयावर दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

हिवर्डी येथे पार पडलेल्या शेतीशाळेत सोयाबीन पिकांची रायझोबियम, पी.एस.बी. या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करून दाखवली, सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे व माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना कसा घ्यायचा याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आंतरपिकांचा अवलंब केल्यास त्या क्षेत्रात लागणारा खर्च हा अंतर पिकातून निघू शकतो, त्यामुळे आंतरपीक पद्धतीचे अवलंब करणेही गरजेचे आहे. त्याबरोबरच हुमणी अळीचे नियंत्रण, कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण, मका पिकातील अमेरिकन अळीचे नियंत्रण (FAW) इ. भित्तिपत्रिकेची माहिती आत्मामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आली.

रुंद वाफा सरी यंत्राने (बी.बी.एफ.) सोयाबीनची पेरणी केल्यास बियाण्यांची गरज २० ते ३० टक्के कमी होते. तसेच खताच्या खर्चातही १५ ते २० टक्के बचत होत असल्यामुळे सोयाबीन पेरणीसाठी बी.बी.एफ. यंत्राचा वापर करावा. बी.बी.एफ.द्वारे सोयाबीन पिकांची पेरणी केल्यास पाण्याचा खंड पडल्यास ही पिकांवर जास्त ताण पडणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रुंद सरी व वरंबा पद्धतीने बीबीएफद्वारे पेरणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.

या कार्यक्रमाला सुदर्शन भुतेकर, युवराज भुतेकर, सुभाष राजकार, श्रीरंग भुतेकर, बालचंद लुंगाडे, रामगुरू शेतकरी गट, रघुवीर शेतकरी गटातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com