क्षमता, गरजेनुसार नियोजन करा : सुहास दिवसे

क्षमता, गरजेनुसार नियोजन करा : सुहास दिवसे
क्षमता, गरजेनुसार नियोजन करा : सुहास दिवसे

औरंगाबाद : कृषी विभागाचे नियोजन संबंधित भागाची गरज, क्षमता ओळखून असावे. यापुढे कृषीच्या योजना, कार्यक्रम पुरवठा करणारे न ठरता मागणीप्रधान कसे राहतील, हे पाहावे, अशा सूचना राज्याचे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी दिल्या. केवळ आकड्यांच्या नियोजनात गुरफटून राहू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठक औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (ता. १०) झाली. फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे, पाणलोटचे संचालक के. पी. मोते, विस्तार व प्रशिक्षण संचालक विजय घावटे, विभागीय आयुक्‍तालयातील अधीक्षक कृषी अधिकारी पोपट शिंदे लातूरचे कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, औरंगाबादचे प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर आदींची उपस्थिती होती.

जलयुक्‍त शिवार अभियानाची स्थिती व कामाची गती याविषयी आढावा विभागीय आयुक्‍तालयातील शिंदे यांनी सादर केला. येत्या ३० जूनपर्यंत अधिकाधिक जलयुक्‍तची कामे होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील ६७८ गावांत ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी कामे झाली आहेत. खासकरून नांदेड, परभणी,  हिंगोली जिल्ह्यांत जलयुक्‍तची कामे सुरू न होण्याची नेमकी कारणे काय ते कळणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. 

२०१६-१७ चा जलपरिपूर्णता अहवाल ग्रामसभेमध्ये  ग्रामपंचायतीस हस्तांतरित करणे आवश्‍यक आहे. एमआरईजीएसतंर्गत फळबाग लागवड योजनेतील अडचणींचाही शिंदे यांच्यासमोर पाढा वाचला. पोकळे यांनी मराठवाड्यातील ठिबकवरील क्षेत्र वाढीच्या प्रमाणावर चिंता व्यक्‍त केली. विशेषत: लातूर कृषी विभागात ठिबकवरील सिंचनाचे प्रमाण नगण्य असून, औरंगाबाद व जालना वगळता हे प्रमाण संपूर्ण दुष्काळी मराठवाड्यात चिंता वाढविणारे आहे. त्यामुळे एका कृषी सहायकाने किमान १५ हेक्‍टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येईल असे काम करावे, अशी अपेक्षा पोकळे यांनी व्यक्‍त केली.

एमआरईजीएस व पांडूरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेचाही प्रतिसाद अत्यल्पच आहे. या योजनेत पेरू, सीताफळ, लिंबू आदी पिकांची लागवड कशी वाढेल ते पाहावे. योजनांसाठी निधीची कमतरता नाही. किती लागवड होईल ते सांगावे. त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही पोकळे यांनी स्पष्ट केले. 

खरीप क्षेत्र वाढणार

अधिकाऱ्यांच्या हस्ते मार्गदर्शनपर घडी पुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, डॉ. एन. आर. पतंगे यांनी गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन, फॉल आर्मी वर्म व हुमनी नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले. लातूर व औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाकडून खरीप नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. येत्या खरीप हंगामात मराठवाड्यात ५० लाख १३ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी नियोजित आहे. जालना वगळता सर्व जिल्ह्यात क्षेत्र वाढीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com