कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजन

अयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे चुकीचे अंतर, रासायनिक खतांच्या वापराचे चुकीचे प्रमाण आणि वेळ तसेच पाणी व कीड व्यवस्थापन या बाबींकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कपाशीचे उत्पादन कमी मिळते.
Cultivation of cotton and greem gram in the 1:2 ratio
Cultivation of cotton and greem gram in the 1:2 ratio

अयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे चुकीचे अंतर, रासायनिक खतांच्या वापराचे चुकीचे प्रमाण आणि वेळ तसेच पाणी व कीड व्यवस्थापन या बाबींकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कपाशीचे उत्पादन कमी मिळते. या सर्व घटकांचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर उत्पादन मिळते.

जमिनीची निवड

  • पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलसंधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर लागवड करावी. (जमिनीचा सामू ६ ते ८.५ पर्यंत)
  • उथळ/कमी खोली असणाऱ्या व हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये.
  • पाणी धरून ठेवणारी व पाणथळ जमीनही कपाशीला हानिकारक ठरते.
  • हवामान 

  • कपाशी हे साधारण ६० ते ७५ सेंमी पावसाच्या प्रदेशात चांगले येते. बियाणांची उगवण होण्यासाठी किमान १५ अंश सें तापमान,
  • पिकाच्या अपेक्षित वाढीसाठी २१ ते २७ अंश सें. तापमान, फुलपाती फळधारणा चांगली होण्यासाठी २७ ते ३३ अंश सें. तापमान आवश्यक असते.
  • जमिनीची मशागत

  • कोरडवाहू लागवडीसाठी भारी व काळ्या जमिनीमध्ये दोनतीन वर्षांनी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करून घेतल्याने मातीची ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या देऊन ३० सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात.
  • शेवटची वखरणीपूर्वी कोरडवाहू कपाशीसाठी ५ टन (१०-१२ गाड्या) व बागायती लागवडीसाठी १० टन (२०-२५ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत शेतात मिसळून द्यावे. परिणामी मॅग्नेशिअम, झिंक इ. सूक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण वाढते.
  • पिकांची फेरपालट पीकपद्धतीचा प्रकार (निखळपीक, मिश्रपीक, आंतरपीक) नुसार अवलंबून असतो. कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकानंतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी. बी टी कापसाची वेचणी लवकर येत असल्यामुळे बी टी कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमूग अशी पीकपद्धती फायदेशीर आहे.

    वाणांची निवड

  • बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
  • महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी आयसीएआर-केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने प्रसारित केलेले वाण - आयसीएआर-सीआयसीआर पीकेव्ही ०८१ बीटी, आयसीएआर-सीआयसीआर रजत बीटी, आयसीएआर-सीआयसीआर सुरज बीटी, आयसीएआर-सीआयसीआर जीजेएचव्ही ३७४ बीटी.
  • पेरणीची वेळ बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली असेल. मात्र, कोरडवाहू  कापूस पिकाची लागवड मॉन्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतरच करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एकरी क्विंटलपर्यंत घट होऊ शकते.

    धूळपेरणी मध्यम ते भारी जमिनीत मॉन्सून पाऊस येण्याचा अंदाज घेऊन ७ ते ८ दिवस अगोदर पेरणी करावी.

    पेरणीचे अंतर

  • बी टी कपाशीमध्ये वाढणाऱ्या बोंडाकडे उपलब्ध अन्नद्रव्यांचे वहन होते. त्यामुळे झाडाची जमिनीस समांतर (आडवी) वाढ कमी होऊन फळफांद्याची लांबी कमी झाल्याचे आढळून येत आहे. बीटी कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी झाडांची संख्या वाढविणे शक्य झाले असले तरी पेरणीचे अंतर खालीलप्रमाणे योग्य असावे.
  • बीटी कापूस कोरडवाहू लागवड : १२० x ४५ सें.मी. (४ x १.५ फूट)
  • बीटी कापूस बागायती लागवड : १५o x ३० सें.मी. (५ x १ फूट) किंवा १८o x ३० सें.मी. (६ x १ फूट)
  • आय सी ए आर-केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने विकसित केलेल्या वाणांची ९० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
  • आश्रयात्मक (रेफ्युजी) ओळी बोंडअळ्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये बी टी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्याचे टाळण्यासाठी बीटी कपाशीसोबत बीटी विरहीत बियाणे लावणे नितांत आवश्यक आहे.

    बीजप्रक्रिया

  • थायरम किंवा कॅप्टन किंवा सुडोमोनास या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करण्यासाठी ॲझेटोबॅक्टर/ॲझोस्पिरीलम व स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करून बियाण्यास चोळावे व सावलीत वाळवावे.
  • आंतरपिके

  • निखळ कपाशी पीक घेण्याऐवजी आंतरपिके घ्यावीत. त्यातून निव्वळ आर्थिक उत्पन्न निखळ कपाशीपेक्षा अधिक मिळते. कपाशीच्या ६ ओळीनंतर तुरीची १ ओळ किंवा कपाशीच्या ८ ओळीनंतर तुरीच्या २ ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती राज्यात राबवली जाते.
  • उडीद व सोयाबीन ही आंतरपिके १:१ प्रमाणात (कापसाच्या एका ओळीनंतर आंतरपिकाची एक ओळ) घेतल्यास फायदेशीर ठरते.
  • कोरडवाहू लागवडीमध्ये १२० x ४५ सें.मी. अंतरावरील लागवडीमध्ये मूग या आंतरपिकाची लागवड १:२ प्रमाणात करावी. मुगाच्या आंतरपीक लागवडीसाठी प्रतिहेक्टरी ६-८ किलो बियाणे लागते.
  • रासायनिक खतमात्रा आणि वेळ  बी टी कपाशीमध्ये सुरुवातीच्या बहाराचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. फुले व बोंडे गळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकाची अन्नद्रव्याची गरज देखील पूर्ण करणे आवश्यक आहे.  

    कापूस पिकासाठी रासायनिक खतांची मात्रा (कि. ग्रॅ. प्रति हेक्टर)
    पेरणीचे वेळेस उगवणीनंतर
    -- नत्र : स्फुरद : पालाश एक महिन्याचे नत्र दोन महिन्याचे नत्र
    बी टी कापूस कोरडवाहू ३०:३०:३० ३० --
    बी टी कापूस बागायती ४०:६०:६० ४० ४०
    निवडक रासायनिक खतांचे प्रमाण
    शिफारशीत रासायनिक खतमात्रा (किलो) नत्र : स्फुरद : पालाश रासायनिक खतांची नावे व प्रमाण प्रति हेक्टर (ढोबळमानाने)
    ३०+३०+३० डीएपी ६५ किलो + युरिया ४० किलो +म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो किंवा
    १५:१५:१५ - २०० किलो किंवा
    २०:२०:०-१५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो किंवा
    युरिया ६५ किलो + सुपर फॉस्फेट १९० किलो +म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो
    १०:२६:२६-१५१ किलो ४० किलो युरिया
    ४०+६०+६० डीएपी १३० किलो + युरिया ४० किलो +म्युरेट ऑफ पोटॅश १०० किलो किंवा
    १५:१५:१५:-२७० किलो + सुपर फॉस्फेट १२० किलो +म्युरेट ऑफ पोटॅश ३० किलो किंवा
    २०:२०:०-२०० किलो + सुपर फॉस्फेट १२० किलो +म्युरेट ऑफ पोटॅश १०० किलो किंवा
    युरिया ९० किलो + सुपर फॉस्फेट३७५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश १०० किलो.
    १०:२६:२६-२३१ किलो ३७ किलो युरिया

    रासायनिक खतमात्रा माती परीक्षणानुसार देणे अधिक योग्य. वरील प्रमाणे खतमात्रा पिकास देताना किती रासायनिक खत द्यावे हे आपण कोणती खते वापरतो यावर अवलंबून असते. ठिबक सिंचनाद्वारे खत देणे अनेक शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने कपाशीचे नियोजन करतात. त्यांना विद्राव्य खते देणे शक्य असते. आपल्या संचास व्हेंच्युरी (ठिबक संचातील पाण्यामध्ये विद्राव्य खत सोडणारे साधन) जोडावी. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांची मात्रा ८०:४०:४० कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश या प्रमाणात प्रति हेक्टर द्यावीत. ठिबक सिंचनातून खते देताना खते १०० दिवसांपर्यंत विभागून द्यावीत. किंवा स्फुरद खते पेरणीबरोबर मातीद्वारे दिली तरी चालतात. लागवडीनंतरचे नत्र व पालाशयुक्त खते व्हेंच्युरीद्वारेच द्यावीत.

    विद्राव्य खताची फवारणी

  • कपाशीला पाते लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर साधारणत: ४५ दिवसानंतर) - दोन टक्के डी.ए.पी. खत
  • बोंडे लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर ७५ दिवसांनी) - दोन टक्के युरिया
  • कोरडवाहू लागवडीमध्ये पीकवाढीच्या काळात (पावसाची उघडीप असल्यास -२ टक्के पोटॅशिअम नायट्रेट- १५ दिवसांच्या आत फवारणी करावी. (दोन टक्के म्हणजे २० ग्रॅम खत प्रतिलिटर पाणी)
  • सूक्ष्म मूलद्रव्ये  माती परीक्षणानंतर मातीमध्ये मॅग्नेशिअम, झिंक, बोरॉन यांपैकी ज्या मूलद्रव्याची कमतरता आहे, ते देण्याचे नियोजन करावे.  उदा. आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावयाचे हेक्टरी प्रमाण मॅग्नेशिअम सल्फेट २० किलो, झिंक सल्फेट २५ किलो व बोरॉन ५ किलो. फुले लागणे व बोंडे पक्व होण्यावेळी मॅग्नेशिअम सल्फेट ०.२ टक्के (२ ग्रॅम प्रति लीटर पाणी) फवारणी करावी.

    संपर्क- डॉ. एस. एम. वासनिक, ९४२३६८०७०७ के. आय. चापले, ७०२०६७९६१८ (केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com