असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजन

चिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व गुणवत्ता वाढण्याची गरज आहे. या दृष्टीने चिकू बागेत एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करावे. वेळेवर कीड,रोग नियंत्रणासाठी उपाय योजना करावी.
scientific pruning of sapota orchards
scientific pruning of sapota orchards

चिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व गुणवत्ता वाढण्याची गरज आहे. या दृष्टीने चिकू बागेत एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करावे. वेळेवर कीड,रोग नियंत्रणासाठी उपाय योजना करावी.  बागेत जमिनीवर पडलेली रोगट फळे तसेच सडलेली व किडलेली फळे वेचून शेताच्या बाहेर जाळून नष्ट करावीत. पावसाळ्यानंतर जमिनीची वरचेवर हलकी उखळणी करावी. पाण्याचा निचरा

  • बागेत जमिनीतील पाण्याचा निचरा होऊन मुळ्यांना हवा मिळणे आवश्यक आहे. याकरिता झाडांच्या दोन ओळी मध्ये जमिनीच्या उतारानुसार चर काढावा. झाडाच्या खोडाजवळ मातीची भर द्यावी. 
  • निचरा झालेले पाणी शेताच्या बाहेर जाईल अशी व्यवस्था करावी
  • बागेचे पुनरुज्जीवन आणि शास्त्रीय पद्धतीने छाटणी

  • २५ ते ३० वर्षापूर्वीच्या जुन्या बागांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी. जुन्या, अनुत्पादित फांद्या काढून टाकाव्यात.
  • जमिनीपासून ३० फूट उंचावर मध्य शेंडा कापून टाकावा. सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचेल याप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाने छाटणी करावी.
  • हिरवळीच्या खतांचा वापर

  • दोन झाडांच्या मधल्या जागेत उडीद, मूग, ताग, धैंच्या यांपैकी एका हिरवळीच्या पिकाची लागवड करून ते जमिनीत गाडावे अथवा या पिकाच्या खोडाजवळ आच्छादन करावे.\
  • कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत, पेंडीचा वापर

  • चांगले कुजलेले शेणखत ट्रायकोडर्माचा वापर करून झाडाच्या आळ्यामध्ये  ५० ते १०० किलो प्रती झाड या प्रमाणात मिसळावे.
  • सोबत निंबोळी पेंड, मोहाची पेंड किंवा एरंडी पेंड यांपैकी एक ५ किलो प्रती झाड शेणखतासोबत द्यावे. ही खते वर्षातून दोन वेळा अर्धी अर्धी मात्रा करून द्यावीत.
  • माती व पाणी परीक्षण

  • बागेतील  माती व पाणी परीक्षण करून घ्यावे.
  • जमिनीचा सामू व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार खतांचे योग्य नियोजन करावे.
  • रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये

  • प्रती झाड १००० ग्रॅम नत्र : ५००  ग्रॅम स्फुरद : ५०० ग्रॅम पालाश या प्रमाणात मुख्य खते वर्षातून तीन वेळा जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी महिन्यात २५, २५ व ५० टक्के विभागून द्यावीत. 
  • यासोबत माती परीक्षण करून गरजे प्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये वरील खतासोबत मिश्रण करून द्यावीत.
  • भात पेंढ्याचे आच्छादन

  • भाताच्या पेंढ्यामध्ये सिलिकॉन हा घटक असतो. खोडाभोवती आळ्यामध्ये भात पेंढा पसरवून त्यावर माती टाकावी म्हणजे पेंढा लवकर कुजून त्याचे खत झाडाला मिळते.
  • आळ्यामध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिकरित्या गांडूळे तयार होतात. ही गांडूळे जमीन भुसभुशीत करून मुळांना हवा मिळवून देतात तसेच गांडूळखत उपलब्ध करून देण्याचे काम करतात.
  • जिवाणू खताचा वापर

  • पी.एस.बी. जिवाणू २ लिटर प्रती एकर या प्रमाणात २०० किलो कुजलेल्या शेणखतात किंवा गांडूळ खतामध्ये आठ दिवस ओले करून सावलीत ठेवावे. 
  • प्रती झाड ५ किलो जिवाणू संवर्धित कंपोस्ट खत झाडाच्या आळ्यात मिसळावे.
  • ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास फ्लूरॉन्सिसचा वापर

  • ट्रायकोडर्मा २ किलो व सुडोमोनास १ किलो प्रती एकर या प्रमाणात वरील प्रमाणे २०० किलो कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खतात आठ दिवस वेगवेगळे ओले करून ठेवावे.
  • प्रती झाड ५ किलो ट्रायकोडर्मा व स्युडोमोनास संवर्धित खत जमीन ओली असताना सर्वत्र बागेत जमिनीवर मिसळावे. हे वर्षातून  तीन वेळा करावे. जूनचा पहिला आठवडा, सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात म्हणजे जमिनीतील सुप्तावस्थेतील रोगकारक बुरशीचा नाश होईल.
  • बागेचे व्यवस्थापन

  • बोर्डो मिश्रण १ टक्के या प्रमाणात दोन फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी जून व दुसरी फवारणी जुलै महिन्यात करावी.
  • तिसऱ्या  फवारणीकरिता मेटॅलॅक्झिल व मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक किंवा फोसेटील ए एल २ ग्रॅम प्रती लिटर पाणी यांपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी खोड, फांद्या व संपूर्ण झाडावर करावी. 
  • फवारणी मध्ये १ मिली प्रती लिटर स्टिकरचा वापर करावा.
  •  प्रकाश सापळ्याचा वापर 
  • चिकू बी खाणारी अळी , कळी  पोखरणारी अळी  व इतर निशाचर वर्गातील किडींच्या व्यवस्थापनासाठी एकरी एक प्रकाश सापळा शेतात लावावा. 
  • संध्याकाळी  ७ ते ९.३० या वेळेतच सापळ्यातील दिवा चालू ठेवावा.
  • बी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

  •  प्रोफेनोफॉस १.५ मिली किंवा इंडोक्झाकार्ब ०.५ मिली किंवा नोव्हाल्युरॉन ०.५ मिली किंवा डेल्टामेथ्रिन १ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कराव्यात.
  • टीप- वरील सर्व कीटकनाशकांसाठी अॅग्रेस्को शिफारशी आहेत. संपर्क - प्रा. उत्तम सहाणे, ७०२८९००२८९ (पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषि विज्ञान केंद्र,  कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com