दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार

दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दहा रुपये प्रतिलिटर अनुदान जमा करावे, यासाठी नव्याने दूध आंदोलन उभारले जाणार आहे.
milk collection
milk collection

नगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दहा रुपये प्रतिलिटर अनुदान जमा करावे, यासाठी नव्याने दूध आंदोलन उभारले जाणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता.१०) माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे नेते व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते अजित नवले यांच्यासह शेतकरी नेत्यांची ऑनलाइन बैठक झाली. आणखी काही समविचारी संघटनांशी चर्चा करुन आज (ता.११) पुढील दूध आंदोलनाची घोषणा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  दूध दराचा प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासून चव्हाट्यावर आहे. त्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. शेतकरी संघटनांसह भाजपनेही आंदोलनात सहभाग घेतला आहे. सरकारने पडून असलेल्या दूध पावडरचा प्रश्न सुटावा यासाठी स्तनता माता व अंगणवाडीतील मुलांना दूध पावडर देण्याचा निर्णय घेतला, परंतु या निर्णयातून वर्षभरात केवळ पाच हजार टन पावडर वापरात येईल. मुळात राज्यभरात सुमारे पन्नास हजार टन पावडर पडून आहे. त्यातून दूध उत्पादकांना दरवाढ मिळण्याला फारसा फरक पडेल असे दिसत नाही. त्यामुळे पावडरीच्या निर्यातीला चालना मिळाली पाहिजे. दूध उत्पादकांना प्रती लिटर थेट दहा रुपयाचे अनुदान मिळाले पाहिजे यासाठी सरकारने लवकर निर्णय घेतला जात नसल्याने तीव्र आंदोलन करण्याची भूमिका रयत क्रांती, व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मांडली.  बैठकीत सदाभाऊ खोत व डॉ. अजीत नवले यांच्यासह शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील, अनिल देठे पाटील, रोहिदास धुमाळ, महेश नवले, शांताराम वाळुज, उमेश देशमुख, सुरेश नवले, खंडू वाकचौरे, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

समविचारी संघटनांना एकत्र आणणार पुढील काही दिवसांत मोठे दूध आंदोलन उभारणार असून त्यात अधिक संघटना सामील व्हाव्यात यासाठी सोमवारी व मंगळवारी काही संघटनांशी श्री. खोत व डॉ. नवले हे बोलून आज (ता.११) आंदोलनाची तारीख व स्वरूप जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com